नवी मुंबई (प्रतिनिधी)- 'जय भवानी, जय शिवाजी,' 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' अशा विविध घोषणांच्या दणदणाटात नवी मुंबईत तिथीप्रमाणे शिवजयंती गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध मंडळांतील तरुणांकडून यानिमित्त शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त वाशीतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाशी से-१७ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर भगव्या पताकांनी अक्षरशः नाहून निघाला होता. शहराच्या विविध भागात भव्य मोटार रॅली, हाती भगवे झेंडे आणि मिरवणूक काढून 'जय भवानी...जय शिवाजी...'च्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवभक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. नवी मुंबईतील एपीमसी फळ मार्केट येथे लेझीम तसेच ढोल ताश्यांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या रंगभूषा, वेशभूषा परिधान करून नागरिक या मिरवणूकीत सामील झाले होते. त्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण तयार झाले होते. आदिवासी कातकरी पाडा राबाडा येथे जय भवानी सेवा संघातर्फे शिवसेना शाखाप्रमुख जितेंद्र झगडे व इतर शिवसैनिकांकडून आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात विविध कार्यक्रम पार पडले. ऐरोली से-५ येथे भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या अॅड. संध्या सावंत यांच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना सिवुडस् शाखा क्र.९८ १०९ यांच्या वतीने तिथीप्रमाणे याहीवर्षी सिवूडसचा राजा चौक से.४२ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी ९.३० वा छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती प्रतिष्ठापना, सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत- शिवरत्न पुरस्कार,चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. तसेच सिवूडस् विभागातील मुले तसेच नागरिक यांच्याकडून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आदर्श सांस्कृतिक कला मंच यांच्यातर्फे सादर करण्यात आलेले अफझल खानाचा वध हे पोवाडा-नाट्य ठरले. शिवजयंतीच्या निमित्ताने काही ठिकाणी शिवज्योती आणण्याबरोबरच विविध उपक्रमही राबवण्यात आले. तिथीनुसार अनेक मंडळे व संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी नवी मुंबईत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगड, किल्ले प्रतापगड, सज्जनगड, पन्हाळा, शिवनेरी, सिंहगड, अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्यांवर विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी शिवज्योत आणण्यासाठी गर्दी केली होती. शिवजयंती निमित्त सकाळपासूनच नवी मुंबईसह जिल्ह्यात शिवजयंती उत्सव मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमाबरोबर प्रतिमापूजन, जन्मकाळ, आकर्षक विद्युत रोषणाई, पोवाडा, शिवचरित्रावर व्याख्यानासह धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील मंडळांनी सकाळपासूनच चौका-चौकात शिवचरित्रावर आधारीत पोवाडे लावले होते तसेच भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबई शहरात शिवमय वातावरण तयार झाले होते.
नवी मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी