महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून कोण जाणार? याबाबतची उत्सुकता आता पूर्णत: संपुष्टात आली असून या सातही जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे, त्यामुळे आता बाकी आहे केवळ निवड झाल्याच्या औपचारिक घोषणेची! तसे पाहता लोकसभा सदस्यनिवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असते आणि राज्यसभेसाठी विधीमंडळ सदस्यांचे मतदान मोलाचे असते. कलाकार, खेळाडू आदी नामांकित काही सदस्यांची निवड राष्ट्रपती करतात. राज्यसभेसाठी दि.२६ मार्च रोजी मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी आठ उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी शेवटच्या दिवशी आले. यात आठव्या अर्जावर आवश्यक आमदारांच्या सह्या नसल्याने तो अर्ज बाद होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे ४ तर भाजपचे ३ खासदार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा अथवा त्याबाबतची औपचारिकता अर्थातच १८ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. तोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियांका चुतर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपचे डॉ.भागवत कराड या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी आज होणार आहे. छाननीनंतर वैध अर्जाची माहिती दिली जाईल. निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत १८ मार्च आहे. ही मुदत संपल्यानंतर आयोगाकडून निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले जाईल. उमेदवारीवर नजर टाकता राज्यसभेच्या ७ जागांसाठी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी १-१ तर राष्ट्रवादीच्या २ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भाजपने आठवलेंसह तिघांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारांव्यतिरिक्त शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठवा अर्ज आला. राजेंद्र चव्हाण यांनी आठवा अर्ज भरला आहे. मात्र या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून आवश्यक दहा आमदारांच्या सह्या नसल्याने तो छाननीमध्ये बाद होणार आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक निकालानंतर अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची महाविकास आघाडी निर्माण होत सरकारही स्थापन केले. परिणामी निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा म्हणजेच विधानसभेत १०५ सदस्य संख्या असलेला भाजप सत्तेपासून दर राहिला. याचे परिणामही आता राज्यसभा निवडणुकीत झाले आहेत. शिवसेनेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे राज्यसभा सदस्य निवडून येण्यात मोठी मदत झाली आहे. अन्यथा शिवसेना-भाजप युती असती तर राज्यसभेत भाजप सदस्य वाढले असते. मात्र राजकारणात तत्कालिन बदल, स्थितीचा परिणाम त्या त्या वेळच्या निवडणूकांवर होत असतो. आताही तो तसाच झाला आहे, युती तुटल्याचा परिणाम भाजपवर झाला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची महाविकास आघाडीमुळे भाजपला नुकसान सोसावे लागले आहे महाराष्ट्रातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना भाजप फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात मोठा खल झाला होता. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला संजय काकडे यांनी विरोध केला होता तर उदयनराजे यांच्या उमेदवारीसाठी स्वतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत होते. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. मध्य प्रदेशात भाजपला फायदा झाला आहे. तेथे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले मध्य प्रदेशातील मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे ज्योतिरादित्य यांना भाजपमध्ये प्रवेश करून काही तास उलटत नाही तोच भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला धक्का दिला आहे. २२ आमदारांना भाजपमध्ये घेऊन गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे भाजपचा फायदा झाला आहे आणि भाजपमुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना खासदारकी मिळेलच शिवाय ते मंत्री होण्याची शक्यता आहेच. भाजपची राजकीय निती दिल्लीतून ठरते; महाविकास आघाडीची महाराष्ट्रातूनच. त्यामुळे नव्या समीकरणांचा फायदा-तोटा हा होणारच!
नव्या समीकरणांचा फायदा-तोटा!