नवी मुंबई महापालिका निवडणूकीत: मराठा क्रांती मोर्चा ६० ते ७० जागांवर पुरस्कृत उमेदवार उभे करणार


कोपरखैरणे (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूका उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने त्यादृष्टीने नवी मुंबईत सध्या वारे वाहू लागले आहेत. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीत मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत ६० ते ७० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती काल मराठा भवन येथे मराठा मोर्चा नवी मुंबईतर्फे आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा समन्वयक अभिजीत पाटील, अॅड जयश्री महाडिक- राजे, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्यक अंकुश कदम, गणेश काटकर, जर्नादन मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गत चार वर्षामध्ये मराठा समाज आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. यात समाजाच्या काही मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्या । अजूनही प्रलंबीत आहेत. नवी मुंबईत एकूण लोकसंख्येपैकी ५० ते ५५ टक्के मराठा समाज वास्तव्यास आहे. मराठा समाजाचे सर्वात मोठी आंदोलने नवी मुंबईमध्ये झाली असून यामध्ये एका मराठा बांधवाला बलिदान द्यावे लागले आहे. नवी मुंबईतून मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये आणि मराठा समाजासाठी ज्या काही १५ ते १६ जणांनी आपले योगदान दिले आहे त्या सर्वपक्षीय उमेदवारांना पाठिंबा देण्यात येईल असेही सांगण्यात आले.