मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा, कॉलेज, जिम, सिनेमागृह, मॉल्स ३१ तारखेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी येथिल सिद्धिविनायक मंदीरामध्ये भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोना बाबत सतर्कता म्हणून मदिर ट्रस्टच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी खबरदारी म्हणून सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असून त्याने हात निर्जंतूक केल्यानंतरच मंदिराच्या आवारात प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता काल मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच मंदिराचे भाविकांच्या प्रती असलेले सामाजिक दायित्व लक्षात घेता भाविकांसाठी श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने घेतला आहे. परंतु, सदर कालावधीत ट्रस्टतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत, मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे. .
'कोरोना'मुळे सिध्दीविनायक मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद
• Dainik Lokdrushti Team