गुन्हेशाखे तिघांना अटक
ऐरोली (प्रतिनिधी) प्रेयसी सोबतच्या संबंधाच्या आड येतो या कारणावरुन प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह ऐरोली खाडीमध्ये फेकून देण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. गत महिन्यात घडून आलेल्या अत्यंत क्लीष्ट अशा या हत्या एपीएम टर्मिनल्स प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यशस्वीरित्या तपास करुन या हत्याप्रकरणी प्रेयसीच्या प्रियकरासह त्याचे इतर दोघे साथीदार अशा तिघा जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव खडक बहादुर सिंग (४५) रा. सदगुरु सोसायटी मागे दत्तनगर घणसोली असे आहे. हत्येप्रकरणी अटक आरोपींमध्ये कैलास शालीग्राम खरात (२९) रा. घणसोली, जयशंकर चव्हाण (२५) रा. नोसीलनाका व वली अहमद मशकअली सय्यद (२०) रा. नोसीलनाका या तिघांचा समावेश आहे. याबाबत हकीकत अशी की, एनआरआय सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खाडी परिसरात दि. १३ फेब्रुवारी २०२० रोजी तीक्ष्ण हत्याराने गळा । चिरुन हत्या केलेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष-३ कडे सोपविण्यात आला. त्यानंतर पथकाने पोलिस आयुक्तालय हद्दीतील मिसिंग व्यक्तींची माहिती काढण्याचे काम हाती घेतले असता, दि.१० फेब्रुवारी २०२० रोजी रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या खडकबहादर सिंग याचे वर्णन एनआरआय हद्दीत मिळून आलेल्या मृतदेहाशी मिळत असल्याने पोलिसांनी खडकबहादुर सिंग याची पत्नी व मुलांकडे चौकशी करुन त्यांना मृताचा फोटो दाखविला असता, सदरचा मृतदेह खडक बहादुर सिंग याचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस पथकाने खडकबहादुर सिंग याच्या नातेवाईकांकडे व तो राहत असलेल्या परिसरात सखोल चौकशी केली असता, सदरचा हा गुन्हा अटक केलेल्या उपरोक्त तिघा जणांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांनाही दि.६ मार्च रोजी नोसीलनाका परिसरातून जेरबंद करण्यात आले. दरम्यान, मृत खडकबहादुर सिंग याच्या पत्नीचे आरोपी कैलास शालीग्राम खरात, रा. घणसोली याच्याशी अनैतिक संबंध होते व या संबंधात खडकबहादुर सिंग हा अडथळा ठरत असल्याने कैलास खरात याने जयशंकर चव्हाण (२५) व वली अहमद मशक अली सय्यद (२०) या नोसीलनाका येथील आपल्या मित्रांच्या मदतीने खडकबहादुर सिंग याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन तसेच त्याच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह ऐरोली खाडीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिल्याने या सर्वांना या गुन्हयात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीची हत्या