नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सोमवारी नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२० करिता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीमध्ये नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र. २४ व २५ मध्ये मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप येथील भाजपचे पदाधिकारी वासुदेव पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष व भाजपचे पदाधिकारी मनोहर पाटील यांच्यासह इतर पदाधीका-यांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केला गेला असून दोन्ही प्रभाग मिळून सुमारे पाच हजार मतदारांची वाढ झाली आहे. याबाबत निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यासह प्रसंगी कोर्टातही धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी नवी मुंबईतील जवळजवळ ९९ टक्के प्रभागातील मतदाराची नावे दुसऱ्या प्रभागात स्थलांतरीत झाली असल्याचा आरोप केला आहे. याविषयी माहिती देताना वासुदेव पाटील व मनोहर पाटील यांच्यासह भाजपच्या येथील असंख्य पदाधीकाऱ्यानी सांगितले कि, महापालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीत लोकसंख्येपेक्षा मतदारच जास्त असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्र. २४ मध्ये यापूर्वी जवळपास साडे आठ हजार इतकी मतदार संख्या होती. मात्र आता त्यात वाढ होऊन हा आकडा ११ हजारांवर गेला आहे. तर प्रभाग क्र.२५ मध्ये यापूर्वी साडेपाच हजार इतकी मतदार संख्या होती. त्यात आता ८ हजार इतकी वाढ झाली असून दोन्ही प्रभाग मिळून पाच हजार मतदार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही ठिकाणी मतदार संख्येत झालेली ही वाढ अवघ्या ४ महिन्यातील असून दोन्ही प्रभागात एकदम एवढे मतदार आले कुठून असा सवाल उपस्थित करत या याद्यांमध्ये बोगस मतदारांच्या नावाचा समावेश झाला असल्याची शंका अस्तित्व केली आहे. यापूर्वी ज्या तरुणांनी वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करतांना संबंधीत विभागाकडे संपूर्ण आवश्यक ती कागदपत्रे सादर करूनही त्यांची मतदार यादीत नावे आली नाहीत. मात्र ज्यांचे पुरावे नाहीत अश्या व्यक्तींच्या नावाचा समावेश या याद्यांमध्ये झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता प्रभाग क्र. २४ व २५ या दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत घोळ झाला असून निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही मतदारयादी जाणीवपूर्वक तयार केली आहे?, असा आरोपही वासुदेव पाटील व मनोहर पाटील यांनी केला आहे. दरम्यान, महापालिका आरक्षण सोडतीमध्ये यंदा पालिकेतील प्रस्तापित नगरसेवकांना चांगलाच धक्का बसला असून अनेकांची यामुळे कोंडी होऊन त्यांना आपले अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी चांगलीच धड्पड करावी लागत आहे. नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र. २४ हा आरक्षण सोडतीत सर्वसाधारण म्हणून जाहीर झाला अनेक जण याठिकाणाहून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. व त्यादृष्टीने त्यांनी आपपल्यापरिने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपतर्फे वासुदेव पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष व गोठीवली गावचे सुपुत्र मनोहर पाटील, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. बाळकृष्ण पाटील यांना यापूर्वी नगरसेवक पद भूषविण्याची संधी मिळाली असून त्यांच्याकडे पूर्वी केलेल्या कामांची शिदोरी आहे. तर वासुदेव पाटील यांची आ. गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक अशी या भागात ओळख असून त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे गोठीवली व राबाडेगाव येथे त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष असलेले मनोहर पाटील यांनी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यावर आजवर भर दिला आहे. असे असले तरी या तिघांपैकी पक्ष नेतृत्व कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकते हे येत्या काळात स्पष्ट होईल. तर प्रभाग क्र.२५ हा यंदा आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती (महिला) म्हणून घोषित झाल्याने भाजपतर्फे माजी नगरसेविका राजश्री कातकरी यांना येथून उमेदवारी देण्याची तयारी भाजप नेतृत्वाने सुरु केली असल्याचे समजते.
BOX
९९ टक्के प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित- नगरसेवक देविदास हांडे पाटील
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला असून राजकीय सोयीसाठी जवळजवळ ९९ टक्के प्रभागातील मतदारांची नावे दसऱ्या प्रभागात स्थलांतरित केली आहेत असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक देविदास हाडे पाटील यांनी यासंदर्भात केला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. (उर्वरित पान ३ वर)