अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा


ऐरोली (प्रतिनिधी)सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर केतकीवर अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच अॅट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळे हिच्या पोस्ट वर सूरज शिंदे ह्या इसमाने भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले, आणि समस्त आंबेडकरी समाजाबाबत शत्रुत्वाची व द्वेषाची भावना मनात ठेऊन अतिशय अपमानकारक व असंवेदनशील कमेंट केली असून याबाबत नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे हिच्यासह सुरज शिंदेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अलिकडच्या काळात आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते.