संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनाची दहशत आता कमालिची वाढली असून कोरोनाने आपल्या देशातही निर्माण केलेली स्थिती गंभीर आणि मोठे आर्थिक नुकसान करण्यास कारणीभूत ठरल्याचे उघड झाले आहे. शाळा बंद, कंपन्या, कार्यालयात विशेष खबरदारी घेणे यासह अनेक सूचनांचा परिपाठ रोजच सुरु असून मानवी आरोग्याच्या हितासाठी त्या सूचनांचे पालन केले जात आहे. मात्र यात काही लोक संधी साधून घेत आहेत. कोणी त्यातून आर्थिक लाभ मिळवित आहे तर कोणी नको त्या अफवा पसरवून मानसिक समाधान मिळवून घेत आहेत. अशा संधीसाधू आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी. काही जणांचे डाव उधळण्यात संबंधीत यंत्रणांना यश आले असून अशा प्रकारची कारवाई अधिक व्यापक व्हायला हवी, अन्यथा, हे संधीसाधू आपले घोडे पुढे दामटवतच राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विशेषतः मुंबईत मास्कची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या एका ऑनलाइन भामट्याने एका उद्योजिकेची चार लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आणि वडाळा टीटी पोलिसांनी याप्रकरणी त्या आरोपीच्या काही अवधीतच मुसक्या आवळत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली, हे उत्तमच. संबंधीत महिला उद्योजिकेचा गणवेश तयार करून परदेशात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. सध्या मास्कची मागणी वाढली असताना परदेशातील विविध कंपन्यांकडून त्यांच्याकडे मास्क पुरवठ्याबाबत विचारणा सुरू झाली. तेव्हा मास्कचा पुरवठा कुठून होऊ शकते, हे शोधत असताना त्यांना इंटरनेटवर ओडिशातील भक्ती एंटरप्रायजेस या कंपनीची जाहिरात दिसली. वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांनी या कंपनीशी संपर्क साधून १४ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या १ लाख ६० हजार मास्कची खरेदीची ऑर्डर दिली. त्यासाठी कंपनीच्या बोदले मुस्ताक याला ५ मार्च रोजी चार लाख रुपयांची आगावू रक्कमही दिली. मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता भक्ती एंटरप्रायजेस ही बनावट कंपनी असल्याचे स्पष्ट झाले. जाहिरातीसाठी मुस्ताकने वेबसाइटवर जोडलेले जीएसटी, आयएसओ सर्टिफिकेटही बोगस असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी मुस्ताक याला न्यायालयात हजर केले असता, त्यास उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या शीघ्र गतीच्या कारवाईचे स्वागत करतांनाच अन्य बाजूंनीही लोकांची फसवणूक करणारे, त्यांची आर्थिक लूटमार करणारे यांनाही भानावर आणण्याची गरज आहे. दुसऱ्याची अडचण ही आपली संधी असे मानत संबंधीतांची आर्थिक लूट करायची, त्यांच्या असहायतेचा फायदा घ्यायचा... असे प्रकार करणारे समाजद्रोही कुठे ना कुठे असतातच, अगदी जवळच जाणाऱ्या प्रवाशांकडूनही जास्त भाडे घेणाऱ्या काही रिक्षाचालकांची अशी लोभी आणि लूटमार करणारी प्रवृत्ती पावसाळ्यात अनुभवास येतेच. आताही काही ट्रॅव्हल्सवाले लोकांकडून जादा भाडे घेत आहेत; कोरोनामुळे अशी संधी ते साधत असून त्यांच्यावर कारवाई करायला हवी. कोरोनामुळे लोक कॉकरेल, ब्रॉयलर कोंबड्यांचे चिकन न खाता बकरी, बोकडाचे मटण खाण्याला पसंती देत आहेत. मात्र हीच संधी साधूनही मटण विक्रेत्यांनी मटणाचे दर वाढवत ग्राहकांची आर्थिक लूटमार सुरु केली आहे. खरे तर यांच्याकडील बोकड, बकरी या प्राणी खरेच खाण्यायोग्य आहेत काय, याची माहिती ना लोक घेत, ना कोणी अधिकारी त्यांची चौकशी करीत... मात्र तरीही लूटमार सुरुच! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही संधीसाधूंची सुरु असलेली ही लूटमार शासन, प्रशासन यंत्रणेने आटोक्यात आणावी आणि संबंधीतांवर कारवाई करावी! मटण विक्रम केली आहे. च
कोरोनाचे संधीसाधू.