खारघर, तळोजा परिसरातील विटभट्टयांची चौकशी करा!


नवी मुंबई (प्रतिनिधी) विटभट्टयांमुळे हवेत प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खारघरतळोजा वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या तक्रारीनुसार खारघर, तळोजा परिसरातील विटभट्टयांची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तहसीलदारांना आहेत. खारघर-तळोजा वेल्फे अर असोसिएशनच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे प्रदूषणाला जबाबदार असलेल्या इतर घटकांसह खारघर आणि तळोजा परिसरात असलेल्या विटभट्टयांमुळे सुद्धा प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड भवन येथील कार्यालयात केली होती. परंतु विटभट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र लागत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने पनवेल तहसील कार्यालयाला पत्र दिले आहे. या पत्राद्वारे खारघर, तळोजा परिसरातील विटभट्टी मालकांची नावपत्यासह माहीती देऊन प्रदूषणाबाबत चौकशी करण्याचे आणि योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, वायू प्रदूषणाविरोधात आंदोलन करण्याऱ्या खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून प्रदूषणाविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याची माहिती असोसिएशचे अध्यक्ष मंगेश रानावडे यांनी दिली आहे.