निर्जंतुकीकरणासाठी एपीएमसी मार्केट बंद


नवी मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत खबरदारी म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात ३१ मार्चपर्यंत भाजी आणि फळ मार्केट गुरुवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद करून मार्केटची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यानुसार काल गुरुवारी फळ आणि भाजी मार्केट बंद ठेवण्यात येऊन मार्केटची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच घेण्यात आले होते. तसेच आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही बाजार समितीने सुरू केला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो. यामधील जवळपास ८० टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. येथील पाच मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी, वाहतूकदार व इतर मिळून जवळपास ५० हजार नागरिक काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मार्केटमध्ये होऊ नये यासाठी बाजार समितीने या विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, काल एपीएमसीतील भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याच्या कामासाठी सदरचे दोन्ही मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी शुकशुकाट पसरला होता. शुक्रवार आणि शनिवारी पुन्हा मार्केट सुरु ठेवून रविवारी पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ३१ मार्च पर्यंत इन आणि आऊटचे गेट निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त इतर गेटमधून प्रवेश दिला जाणार नाही. गेटवर प्रवेश करताना सॅनिटाइजरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राज्यात आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या १२०० ते १५०० गाड्यांची आवक होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मार्केट पूर्ण बंद असल्याने इथे शुकशुकाट दिसत होता. मार्केटमध्ये एकाही गाडीला प्रवेश दिला गेला नाही. दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटची वेळही बदलून दुपारी चारवाजता हे मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला असल्याचे समजते. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी बाजार समिती शक्य ती सर्व खबरदारी घेत आहे. एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची ऑर्डर फोनवरुन घ्या आणि माल घरपोच पाठवा, अशा सूचना प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.व त्यानुसार सध्या व्यवहारही होताना दिसत आहेत.