नवी मुंबई (प्रतिनिधी) - घणसोली येथील नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेच्यावतीने घणसोली से-३ याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे गुरुवारी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते अत्यंत साध्या पध्दतीने फीत कापून लोकार्पण करण्यात आले. दरम्यानमागील जवळपास एक वर्षांहुन अधिक काल घणसोलीतील हे सेंट्रल पार्क उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे कधी एकदा हे उद्यान सुरु होते याबाबतची प्रतीक्षा येथील नागरिकांना लागून राहिली होती. त्यानुसार काल अखेरीस या पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडल्याने येथील नागरिकांची आता मोठी सोय झाली आहे. याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती शशिक ला सुतार, स्थानिक नगरसेविका सुवर्णा पाटील, नगरसेवक प्रशात पाटील, कमलताई पाटील, उषा पाटील, निलम जगताप, कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार, विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. घणसोली सेक्टर-३ येथे रेल्वे स्टेशनसमोर ३९१३५. ७१ चौ.मी.इतक्या विस्तृत भूखंडावर विकसित करण्यात आलेल्या या सेंट्रल पार्कमध्ये वायू, भूमी, अग्नी, जल व आकाश ही निसर्गातील पंचतत्वांची संकल्पना अत्याधुनिक पध्दतीने साकारण्यात आली आहे. यामध्ये उद्यानाच्या उंच भव्य अशा मुख्य प्रवेशव्दारावर व्ह्यूवींग गॅलरी रचना करण्यात आली असून त्यावरून संपूर्ण पार्कचे विहंगम दृश्य पाहण्याची सोय करण्यात आली आहे.प्रवेशव्दारातून आत प्रवेश करताक्षणीच पंचव्दीप स्क्वेअर स्वरूपातील कारंजाची तसेच ठिकठिकाणी पाषाणशिल्पांची लक्षवेधी रचना करण्यात आलेली आहे. तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी याठिकाणी २५ मी. २० मी. आकाराचा सेमी ऑलिम्पिक तरण तलाव असून त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी व चेंजींग रूम्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय १५० मी. ६ मी. आकाराची स्केटिंग रिंग असून फिटबॉल व क्रिकेट खेळासाठी ८२५ चौ.मी.चा मल्टी स्पोर्टस् एरिया नेटसह उपलब्ध आहे. लहान मुलांसाठी वैविध्यपूर्ण खेळण्यांसह दोन जागी खेळण्यांची ठिकाणे विकसित करण्यात आली असून दुखापत होऊ नये म्हणून त्या क्षेत्रात रबर मॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आरोग्याविषयी सजग असणाऱ्या नागरिकांकरिता ६६५ मी. ४. २० मी. चा जॉगिंग ट्रॅक पार्कच्या सभोवताली उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यासोबतच ३१० मी. ३ मी. चा सायकल ट्रॅकही उपलब्ध आहे. यासह १५ मी. १६ मी. क्षेत्रात क्टिव्हिटी कॉर्नर विकसित करण्यात आले आहेत. या सेंट्रल पार्कमध्ये विविध कार्यक्रमांसाठी म्फिथिएटर, पार्टी लॉन क्षेत्र अशा सुविधाही असून महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ५0 चारचाकी वाहनांचा व ६० दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त असे वाहनतळ आहे. यावेळी महापौर जयवंत सुतार यांनी या लोकार्पणाप्रमाणेच सेक्टर-७ येथील मैदानास माजी नगरसेवक संजय बालाजी पाटील क्रीडांगण तसेच सेक्टर-७ येथील नमुंमपा शाळा क्र. ७६ व १०५ ला अरविंदभाई मफतललाल प्राथमिक व माध्यमिक शाळा असे नामकरणही नगरसेविका कमलताई पाटील यांनी सूचविलेल्या व महापालिका सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेल्या ठरावांच्या अनुषंगाने झाल्याचे यावेळी जाहीर केले.
घणसोलीतील सेंट्रल पार्कचे लोकार्पण