नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्पर्धकांचा रेकॉर्डब्रेक सहभाग


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यातील ३६० हून अधिक जलतरणपटूंनी उत्साही सहभाग घेत जिल्हास्तरीय सहभागाचा विक्रम नोंदविला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशीतील एनएमएसए स्पोर्टस् असोसिएशनच्या तरण तलावामध्ये आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेचे उद्घाटन काल महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सहभागी जलतरणपट्टचे अभिनंदन केले. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा अधिकारी खप्पा गुरव, ठाणे जिल्हा जलतरण संघटक व राष्ट्रीय प्रशिक्षक, पंच संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य जलतरण असासिएशनचेसचिव किशोर शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जलतरणपटू गोकुळ कामथ, जलतरण प्रशिक्षक संकेत सावंत, सागरी जलतरणपटू रूपाली रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी साधारणत: जिल्हास्तरीय स्पर्धेत दोनशेते अडीचशे पर्यंत जलतरणपटू सहभागी होतात, मात्र नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत यावर्षी ३६० हुन अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेत रेकॉर्डब्रेक उपस्थिती दर्शविली त्याबद्दल कौतुक करीत नवी मुंबईच्या क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी राबविल्या जात असलेल्या नानाविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सायं. ५ वा. होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.