सलग तीन दिवस कचरा रस्त्यावर पडून... दुर्गधीने उरणकर हैराण


उरण (प्रतिनिधी) - उरण नगरपालिका हद्दीतील कचरा ठेकेदाराने गेले तीन दिवस न उचल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेने केली आहे. उरण नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. परंतु त्यांच्याकडून शहरातील कचरा गेले तीन दिवस उचलण्यात आला नाही. यामुळे कचऱ्याची रास होऊन त्यातून दुर्गंधी पसरली होती. उरण कोटनाका येथील मासळी मार्केट परिसरात पूर्णपणे दुर्गंधीच पसरली होती. कचऱ्यावर फिनेलही न मारल्याने उग्र वास पसरला होता. या वासाने काहींना उलटी व डोकेदुखीचा त्रास संध्याकाळ पर्यंत जाणवत होता. तर या कचऱ्यात किडी पडल्या होत्या. त्यामुळे मासळी विक्रे त्या महिलांमध्ये उरण नगरपालिका विरोधात संतापाची लाट पसरली होती. याबाबत ठेकेदाराच्या मुकादमाकडे विचारणा केली असता त्यांनी जेसीबी नसल्यामुळे कचरा उचलण्यात आला नसल्याचे कारण सांगितले. ठेकेदाराकडून अनेकवेळा अशा घटना घडत असल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात. तसेच कचरा गाडीवर काम करणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठेकेदार कोणतीच खबरदारी घेताना दिसत नाहीत. कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज, गमबुट न घालता कचऱ्यात काम करतानाचे चित्र पहावयास मिळते. तरी कामगारांना साहित्य देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.