कोरोनाची दहशत!

गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचीच (व्हायरस) चर्चा जगभर असून चीनमध्ये या आजाराने दीड दोन हजार लोक दगावल्याने आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये याच आजाराची लागण झालेले अनेक रुग्ण सापडले आहेत, अनेकांची संशयित म्हणुन तपासणी केली जात आहे. त्यामुळे सुरुवातीला चीनपुरता मर्यादित वाटणारा मात्र त्यानंतर काही दिवसांतच विविध देशांत शिरकाव करणाऱ्या कोरोना विषाणुपासून होणाऱ्या आजाराने साऱ्यांचीच झोप उडविली असून या आजाराने नागरिकांमध्ये आता दहशत निर्माण केली आहे हे मान्य करायला लावेल, अशी स्थिती आहे. कोरोनामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव लक्षात भीती व्यक्त केली गेली; मात्र काही तासांतच खबरदारी घ्या, दक्ष रहा, उपचारा करा... अशा प्रकारच्या सूचना वेगाने दिल्या जावू लागल्या आणि या आजाराची दहशत वाढल्याचेही पटू लागले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचं संक्रमण फैलावत चालले असून त्यामुळे सरकारच्या आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडतेय, हे वास्तव आहे. सध्या देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एकट्या महाराष्ट्रात ११ करोनाबाधित असल्याचे समोर आले असून भारतात आत्तापर्यंत एकूण ७३ जणांना करोनाची लागण झाल्याचे काल सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तशी आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १७ परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. चीनच्या वुहानमधून जगभर फैलावलेल्या या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने अखेरीस 'महारोग' म्हणून घोषित केले आहे. यामुळेही अर्थातच या आजाराचे गांभीर्य स्पष्ट झाले असून कोरोनाची दहशत वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित केरळ राज्यात आढळले असून तेथे १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा... महाराष्ट्रात ११, उत्तर प्रदेशात १० तर दिल्लीत ६ करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची आकडेवारी सांगते. त्यामुळे देशातील सर्वच राज्यांमध्ये खबरदारी घेणे, सूचना पाळा... अशा प्रकारची आवाहने केली जात आहेत. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातही कोरोनाने खळबळ उडवून दिली आहे. पुण्यात एकाच दिवशी पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात पुण्यातील ८ तर मुंबईतील २ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील काही शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर करोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो ही भीती लक्षात घेता औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलावी, अशी विनंती लेखी स्वरुपात महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पैठण येथे होणारा नाथषष्ठीचा उत्सव रद्द करण्यात आला असून मुस्लीम बांधवांचा इज्तेमाही रद्द करण्यात आल्याचे तेथील प्रभारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. औरंगाबाद या शहरात आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. त्यामुळे या विषाणूची लागण होऊ नये म्हणून अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे. प्रशासन आणि महापालिका या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज असले तरी सार्वजनिक यात्रांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर कोरोनाची व्याप्ती वाढत असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी अधिवेशनाच्या कामात अडकून पडू नयेत यासाठी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधीच म्हणजे शनिवारी गुंडाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेले दहा रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने आवश्यक ते सर्व खबरदारीचे उपाय योजले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती देत जत्रा, मेळावे व गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर करण्याची आज तरी आवश्यकता नसून येत्या दोन दिवसात परिस्थिती पाहून तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. एकंदरीत राज्यातही कोरोनाची दहशत वाढली असल्याचे स्पष्ट होत असून स्वत:पासून सज्जता ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे!