महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका


नाशिकमध्ये संशयित रुग्ण सापडला


नाशिक - भारतात कोरोना व्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. चीनहन भारतात परतलेले कोरोना व्हायरसचे पहिले ३ रुग्ण नुकतेच बरे झाले, भारत सुटकेचा निश्वास टाकतो न टाकतो तोच आता महाभयंकर असा कोरोना व्हायरस भारतात पुन्हा आला आहे. सोमवारी नवी दिल्ली आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर जयपूरमध्येही एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शिवाय नवी दिल्लीतील रुग्णाला कोरोना व्हायरस असल्याचं निदान होण्यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशातील नोएडात आपल्या मुलाच्या बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामुळे शाळेतील मुलं आपल्या पालकांसह आली होती. त्यामुळे आता खबरदारी म्हणून या मुलांना आणि पालकांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. शिवाय शाळाही बंद ठेवण्यात आली आहे.