डी वाय पाटील विद्यापीठ परिसरातील इमारतीला आग


नेरुळ (प्रतिनिधी )- नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या परिसरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृह इमारतीला काल दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या परिसरात गर्ल्स वसतिगृहासाठी इमारत उभारण्याचे कामकाज सध्या सुरु असून काल दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या घटनेची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी गणेश _पाटील यांच्यासह इतर कर्मचारी तसेच नेरुळ व सीबीडी येथील बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन उपाययोजना करत तासाभरात आग आटोक्यात आणली. सुरवातीला कॅम्पसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले असल्याने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नसल्याची माहिती नेरूळ अग्निशमन दलाकडून देण्यात आली. इमारतीतील थर्माकोलमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग विजविण्यात अग्निशमन दलास यश आले. दरम्यान, डी वाय पाटील स्टेडियम, हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी हॉस्टेल सर्व एकाच परिसरात असल्यामुळे आगीच्या घटनेनंतर तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.