मुंबईचे नवे पोलीस आयुक्त परमबीर सिंह


मुंबई (प्रतिनिधी) -मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान मुंबई _पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह १९८८ च्या आयपीएस बॅचचे आधिकारी आहेत. याआधी परमबीर _सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी बिपीन के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बर्वे ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. मात्र त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात होती, ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा तीन महिने मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदतवाढ २९ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने रिक्त झालेल्या आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याचं पोलीस अधीक्षक पद सांभाळलं आहे. याशिवाय एटीएसचे डेप्युटी आयजीही होते. परमबीर सिंह यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तपद सांभाळलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गॅगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती, तो अद्यापही कारागृहात आहे.