रबाळे एमआयडीसीत खोदलेल्या चिखलमय रस्त्यात ट्रक पलटला

एमआयडीसीच्या कारभाराबद्दल रहिवाशांत संताप



ऐरोली (प्रतिनिधी) - रबाळे एमआयडीसीतील प्लॉट नंबर-आर- ९६७ प्रोमास इंजिनीअरिग कंपनी समोर नवा रस्ता बनविण्याचे काम एमआयडीसीतर्फे मागील चार महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. पुढील काम सुरू करण्यास दिरंगाई होताना दिसत असून रस्त्याच्या व गटारांच्या कामासाठी थेट पाणी याचठिकाणी सोडले जात असल्याने या रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एकंदरीत या प्रकारामुळे चिखलमय रस्त्यावरून वाहन चालविणे तर सोडा नागरिकांना चालणेही अवघड झाले असून रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांकडून जोर धरू लागलेली असतांनाच काल दुपारच्या सुमारास येथील रस्त्यावरील चिखलात एमआयडीसी परिसरात माल घेऊन येणारा एक ट्रक रुतून तो पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाला नसला तरी ट्रक चालक ट्रकमध्ये अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकाना मोठे सायास करावे लागले. दरम्यान, या रस्त्याच्या झालेल्या अवस्थेकडे लक्ष देण्यास एमआयडीसी प्रशासनाला अजून वेळ मिळत नसल्याने याठिकाणी एमआयडीसी प्रशासन एखादी मोठी अपघाती घटना होण्याची प्रतीक्षा करत आहे का? असा संतप्त सवाल कामगार वर्गाकडून केला जात असून निदान आता तरी या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एमआयडीसीने उपाययोजना करीत नागरिकांची रोजच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी होत आहे.