विवाहितेच्या छळवणूक प्रकरणी सासरच्या तिघावर गुन्हा दाखल

पनवेल (वार्ताहर) - नेरुळ से-१५ येथे रहाणाऱ्या एका विवाहितेचा तिचा दंत चिकित्सक असलेल्या पतीसह सासू-सासरे आदी मंडळींने हंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ _केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे शहर पोलिसांनी या प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू व सासरा अशा तिघा जणांवर छळवणुकीसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील विवाहितेचे नाव प्रिती हवेरी (३१ ) असे आहे. वर्ष २०१६ मध्ये प्रिती हिचा विवाह मूळच्या कर्नाटक मधील बेळगाव मधील रहिवाशी असलेल्या व दंतचिकित्सक असलेल्या राजीव रुद्राप्पा हवेरी याच्यासोबत झाला होता. दरम्यान, राजीव हवेरी व त्याच्या आईवडिलानी आपसांत __संगणमत करुन विवाहापूर्वी त्यांच्या खारघर येथील राहते _ घरी प्रीती हिच्या आई-वडिलांकडे हुंडा म्हणुन साडेतीन लाख रुपये व ३० तोळे सोन्याचे दागिन्यांची मागणी करुन सदरची रक्कम तसेच २१ तोळे वजनाचे सोन्याचे स्त्रिधन स्विकारुन त्याचा अपहार केला असल्याचे प्रीती हिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतरचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर प्रीती हिचा पती राजीव व तिच्या सासरकडील मंडळींनी तिला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे पती राजीव रुद्राप्पा हवेरी याला क्लिनीक उघडुन न दिल्यास मला परत कधीही _मुंबईला पाठवणार नाही अशी धमकी देत फर्निचर व इतर साहित्याची मागणी करुन सदरचे साहित्य हलक्या प्रतीचे दिले म्हणुन सतत टोमणे मारुन मानसिक त्रास देणे असे प्रकार सुरु झाले. अखेर हा त्रास असह्य झाल्याने प्रीती हिने माहेर गाठले व नंतर तिने कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रीती हिचा डॉक्टर पती राजीव हवेरी, सासरे रुद्राप्पा अप्पायप्पा हावेरी व सासु गिता रुद्राप्पा हावेरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरु आहे.