जेएनपीटी (वार्ताहर) - उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १२ तासात झालेल्या ३ वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघाजणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांची उरण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या तीनही अपघातांना कारणीभूत असलेल्या संबंधीत वाहन चालकांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या अपघातात मरण पावलेल्यांपैकी दोघांची ओळख पटली असल्याची पोलिसांनी दिली. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विदेश एकनाथ पाटील (३३, रा. वेश्वी) हा दिघोडे येथिल प्राथमिक शाळेजवळ उभा असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा अपघात बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जासई गावदेवी मंदिराजवळ झाला. या अपघातात अनिल विलास गदादे (२६) हा जागीच ठार झाला. अनिल गदादे हा आपल्या दुचाकीवरून उरण बाजून गव्हाणफाटा बाजूला जात असताना त्याची दुचाकी घसरुन पडली आणि त्याच वेळेला पाठिमागून आलेले अवजड वाहन त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा अपघात हा करळ पुलाजवळ झाला. दुचाकीस्वार दुचाकीवरून जात असताना त्याचा अपघात झाला. काल गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचे कारण मात्र कळू शकले नसून अपघात झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.
उरणमध्ये तीन वेगवेगळ्या अपघातात तिघाचा मृत्यू