६२ लाखांची वीजचोरी उघड, ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल


नवी मुंबई (प्रतिनिधी)महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागांतर्गत नवी मुंबईसह पनवेल, उरण भागात वीज चोरीविरुध्द केलेल्या धडक कारवाईतून सुमारे ६२ लाखाची वीजचोरी उघड झाली असून याप्रकरणी महावितरणने ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कोकण प्रादेशिक अंकुश नाळे यांच्या सूचनेनुसार वाशी मंडळांतर्गत गेल्या फेब्रुवारीमध्ये ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, बेलापूर, पनवेल, उरण व इतर ठिकाणी वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. यावेळी २५९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्या अंतर्गत रु. ६८ लाख २८ हजार रु.ची वीजचोरी उघड करण्यात आली आहे. त्यापैकी ८९ लोकांनी वीजचोरी पोटी रु. ३२ लाख ५ हजार रु. रोख स्वरुपात भरणा केलेला आहे. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने गोठीवली येथील चिन्मय चक्रवर्ती, संदीप जोशी, गजानन मंदावकर, मनोहर मंदावकर, सचिन पाटील, योवन ऐस्किमुथू, राहुल पवार, जयवंतसिंग पाटे, सागर काले (पंकज सिंग) यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी विरोधातील ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, महावितरण कंपनीची हानी रोखण्याकरिता, येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याने कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन वाशी मंडळचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले आहे.