कोकण विभागात कोरोना विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना - महसूल आयुक्त शिवाजी दौड


नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोकण विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराबाबत शासकीय पातळीवर सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. जनतेने आवश्यक काळजी घेऊन स्वत:चे आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी केले आहे. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोकणातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचा बैठका घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण विभागात कोरोना व्हायरस प्रसार प्रतिबंध उपाययोजनेसाठी कोकण भवन येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून कोरोना विषयी जनतेला अडचण असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवाजी दौंड यांनी यावेळी केले. पी.पी.इ.किट्स आणि एन-९५ मास्कची विक्री औषध दुकानातुन केली जाते. या मास्कची मुळ किंमती पेक्षा जास्त आकारणी होत असल्याचे व अनावश्यक खरेदी करून साठा होत असल्याचे निर्देशनास आल्यास तशी तक्रार शासनाकडे करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही महसूल आयुक्त शिवाजी दौंड म्हणाले. काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकण विभागात मुंबई शहर, उपनगरासह पाचही जिल्ह्यात तपासणी पथके, स्कॅनिंगची सोय करण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड यांच्या मदतीने बाहेरहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ८७ हजार प्रवाशांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. कोकणातील जनतेने होळी उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे. सर्वसामान्य जनतेला मास्क घालण्याची आवश्यकता नाही असेही स्पष्ट केले. यावेळी आरोग्य विभागाच्या _ उपसंचालक डॉ.गौरी राठोड, उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे, उपायुक्त (नियोजन) बा.ना.सबनीस, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ उपस्थित होते. यावेळी उपसंचालक (आरोग्य) डॉ. गौरी राठोड यांनी कोरोना विषयक माहिती दिली.


BOX


कोरोना विषयी नियंत्रण कक्ष


या नियंत्रण कक्षात डॉ.बालाजी फाळके वैद्यकीय अधिकारी, पनवेल दूरध्वनी क्र.८८८८८०२८२०डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी, कोकण भवन ९८२१८०४८०४, श्री.अनिल पवार गट विकास अधिकारी ८८०५९५१८९९श्री.दिपक वानखेडे नायब तहसिलदार ९७५७१०८७१७, यांचा समावेश आहे. या नियंत्रण कक्षात या विषयी प्राप्त होणारे संदेश नोंदविण्यात येतील. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२२२७५७१५१६ असा असणार आहे.