नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली असून काल त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सिडकोचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी अश्विन मुद्गल हे नागपूर येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या अश्विन मुद्गल यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हा दंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळ येथे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिकेचे आयुक्तनागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत. सद्यस्थितीत सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास आपले प्राधान्य असेल, असे नवनियुक्त सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारते वेळी सांगितले.
सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल