बालकामगारांचे भले करा!

मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही विविध नोकरीव्यवसायानिमित्ताने ये-जा करणाऱ्यांची संख्या काही लाखाच्या घरात आहे. त्यापैकी काही लोक शहरात वास्तव्य करीत आहेत तर काही जण दरवरुन ये-जा करीत असतात. शिवाय शहरात बालकामगारही कार्यरत असल्याचे दिसून येते. मात्र कायद्यानुसार बालकामगार असलेला मुलगा-मुलगी कामावर ठेवणे हे बेकायदा आहे आणि त्यानुसार कारवाईही होत असतेनवी मुंबईतील अशा बालकामगारांचा शोध घेण्याची मोहीम सध्या सुरु असून पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील मार्केट परिसरातील काही दुकाने व हॉटेलमध्ये बालकामगार आहेत काय, याचा शोध घेतला जात आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व कामगार आयुक्तालयाने पनवेल व नवी मुंबई परिसरातील मार्केट परिसरातील काही दुकाने व हॉटेलमध्ये छापा टाकत बालकामगारांचा शोध घेण्याचे सत्र उघडले आहेशहरातील तुर्भे गाव व एपीएमसी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून सहा बाल कामगारांची सुटका करतांनाच या बाल कामगारांना कमी वेतनात अति श्रमाचे काम देऊन राबवून घेणाऱ्या पाच आस्थापना चालकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. या कारवाईचे स्वागत करायला हवे. वयाची १८ वर्षे झालेले बालकामगार हे नक्की किती दिवसापासून, महिने वा वर्षांपासून कुठेही राहत असतात; काही जण आई वडिलांसोबत असतात तर काहींचे पालक कोण हेही माहित नसते. बहतेकांचे शिक्षणही अजिबात झालेले नसते. मात्र परिस्थितीनुसार आणि पोटाला अन्न हवे म्हणून ते मिळेल तेथे काम आणि मालक देईल तितके दाम घेत काम करीत असतात. कमी वेतन वा पैशातही काही बालकामगारांना काही मालक लोक राबवत असतात. यात काहींची फसवणूक, पिळवणूकही होत असते. मात्र ही मंडळी तक्रार तरी कुठे करणार? अशा अवस्थेत ते एकेक दिवस लोटल्यागत जगत असतात. नुकतेच तुर्भे गाव व एपीएमसी मार्केट परिसरातील काही दुकाने व हॉटेलमध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यात आल्याचे तसेच त्यांच्याकडून कमी वेतनात अतिश्रमाचे काम करून घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळताच केलेल्या कारवाईत बालकामगार म्हणून काम करणाऱ्या काही मुलांची सुटका केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक आणि ठाणे कामगार आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील दुकाने निरीक्षकांनी ही कारवाई केली. या कारवाईत या पथकाने तुर्भे गाव येथील जनता मार्केटमधील एका चहा सेंटरवर छापा मारून त्या ठिकाणी कामाला असलेल्या १३ वर्षीय मुलाची सुटका केली. तुर्भे सेक्टर-२१ मधील एका भोजनालयावर छापा मारून १६ वर्षीय मुलाची सुटका केली. वरील दोन्ही कारवाईत संबंधीत मालकांनी त्या अल्पवयीन मुलांना कमी वेतनात कामास ठेवल्याचे आढळले. याशिवाय आणखी चार अल्पवयीन मुलांचीही सुटका करण्यात आली. एकूनच या सहाही अल्पवयीन मुलांना वा बालकामगारांना कामावर ठेवत त्यांच्याकडून किमान पैशात काम करुन घेणे... हा समान मुद्दा असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, भंगारवाले यासह अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून बालकामगारांना कामावर ठेवले जाते. दोन वेळचे जेवण व झोपायला जागा मिळणे ही त्यांची मुख्य इच्छा पूर्ण होत असली म्हणजेच त्यांच्या पोटापाण्याचा आणि निवान्याचा प्रश्न मिटत असला तरी यातून बालकामगार म्हणून त्यांचे शोषण होतेच. यावर प्रतिबंध आणण्यासाठी अशा कारवाया केल्या जातात. पनवेलमध्येही अशा प्रकारची कारवाई होत आहे. शहरात असे अनेक बालकामगार असू शकतात, त्यांचीही मुक्तता करावी आणि बालकामगारांची फसवणूक करणाऱ्याना शिक्षा केली जावीतरच कदाचित बालकामगारांना कामावर ठेवत त्यांची सुटका होईल. सरकारनेही अशा मजबुरीने काम करणाऱ्या बालकामगारांबाबत धोरण ठरवत त्यांच्या राहणे आणि शिक्षण व वैद्यकीय सोय-सुविधा करीत त्या बालकामगारांचे भले करण्याची गरज आहे.