'ज्येष्ठ नागरिक दिन' समारंभ उत्साहात साजरा


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी (से.६) येथील साहित्यमंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासारखी अभिनव संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका असून यापुढील काळात 'आबा आहे तर घराची शोभा आहे' या आगरी म्हणी नुसार ज्येष्ठांसाठी अधिक उत्तम काम महापालिका करेल असा विश्वास महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त क्रांती पाटील, महापालिकेच्या ज्येष्ठ नागरिक __स्वतंत्र कक्षाचे सदस्य तथा अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे __माजी अध्यक्ष डी.एम. चापके तसेच स्वतंत्र कक्षाचे सदस्य भ.र शेजाळे आदी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य डि.एम.चापके यांनी नवी मुंबई महापालिका ही ज्येष्ठांचा सन्मान करणारी देशातील अग्रणी महापालिका असल्याचे गौरवोदारकाढले. सरकारचे ज्येष्ठ नागरिक धोरण येण्याआधीपासून नवी मुंबई महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून स्वतंत्र कक्ष स्थापन केला तसेच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासारखी दिलासा देणारी योजना प्रभावीपणे राबविली याबद्दल डि.एम.चापके यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रौढांच्या अॅथलॅटिक्स स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्तरावर ९४ पदके संपादन करणाऱ्या उत्तम अण्णा माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या १४२ ज्येष्ठ नागरिकांना तसेच विवाहाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या २२ ज्येष्ठ नागरिक दांपत्यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कॅरम, बुध्दिबळ, गायन, काव्यवाचन, वेशभुषा, कथाकथन, अभिनय, निबंध, ब्रीज असा विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनाचा हा सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाप्रमाणेच संगीतमय मैफिलीने सजला.