महापालिकेत अभ्यागतांना तात्पुरती बंदी!

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचा उपाय



नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनो विषाणूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालय व इतर कार्यालयात अभ्यागतांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले आहेत. सध्या संपूर्ण जगभरात विविध देशांत कोरोनो विषाणूची लागण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूद्वारे प्रसारित रोगास जगभर पसरलेला साथीचा रोग म्हणून घोषित केलेले आहे. संपर्कातून या विषाणूचा प्रसार होत असल्याने त्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंत्रालयामध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना तात्पुरती प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ___ कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग गर्दीच्या ठिकाणी होऊ नये याकरिता सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिकेत विविध कामांसाठी नागरिकांप्रमाणेच इतर संस्था, समूह, मंडळे यांचे पदाधिकारी तसेच कंत्राटदार, नागरिक अशा अभ्यागतांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता पुढील सूचना होईपर्यंत महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचे काही तातडीचे काम असल्यास त्यांनी महानगरपालिकेच्या पब्लिक ग्रिव्हेन्स प्रणालीवर आपली तक्रार अथवा सूचना नोंदवावी तसेच ईमेल वा व्हॉट्स प संदेशाव्दारे अथवा दूरध्वनी वा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये मुख्यालयात महापौर व इतर पदाधिकारी तसेच विविध समित्यांचे सभापती, विभागप्रमुख यांचेकडे अतिमहत्वाच्या व तातडीच्या कामाकरीता तसेच अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश अनुज्ञेय असणार आहे. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून आवश्यक काम असल्यासच मुख्यालयात यावे असे स्पष्ट करण्यात आले असून महापालिका मुख्यालय इमारतीत कार्यालय असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र बघून प्रवेश देण्यात येणार आहे. ठेकेदारांची देयके ही ऑनलाईन आरटीजीएस पध्दतीने अदा केली जात असल्यामुळे कोणत्याही ठेकेदाराने याबाबतचा पत्रव्यवहार ईमेलव्दारे करावा असे सूचित करीत अत्यावश्यक काम असल्यास संबंधित विभागप्रमुखांची पूर्व परवानगी घेऊन महापालिका कार्यालयात यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. __ महापालिका मुख्यालयांतर्गत विभागप्रमुखांनी आगामी कालावधीत होणा-या नियोजित सभा वव बैठका आपल्या स्तरावर पुढील आदेश होईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात तसेच, अत्यंत तातडीच्या वा महत्वाच्या असतील अशाच बैठका आवश्यकतेनुसार आयोजित कराव्यात व या बैठकांमध्ये खाजगी व्यक्तींना आमंत्रित करु नये असे या आदेशात सूचित करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांची जन्म - मृत्यू नोंदणी व इतर परवानग्या, दाखले या विषयी विभाग कार्यालय स्तरावरील व मुख्यालय स्तरावरील अत्यावश्यक कामे शक्यतो ऑनलाईन सेवेव्दारे करण्याचा प्रयत्न करावा. तसेच अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई- मेलव्दारे पाठविण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांची पत्रे तसेच मुख्यालयातील दैनदिन टपाल व इतर महत्वाची पत्रे स्विकारण्यासाठी मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दार क्रमांक १ याठिकाणी सुरक्षा रक्षक चौकीमध्ये टपाल स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी पत्रव्यवहारासाठी ऑनलाईन प्रणाली वापरावी असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्शाव्दारे होणारा संसर्ग रोखण्याकरीता मुख्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी यांची बायोमेट्रिक मशीनव्दारे होणारी हजेरी प्रक्रिया थांबविण्यात आली असून प्रत्येक विभागाने त्यांच्या आस्थापना शाखेत हजेरीपट ठेवून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद ठेवावी व अधिकारी व कर्मचारी निश्चित वेळेत येतील याची खबरदारी घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.