खारघर बोगद्याचा आराखडा तयार!


नवी मुंबई (प्रतिनिधी)- तुर्भे ते खारघर या भुयारी मार्ग प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागाराने या कामाचा अंतिम आराखडा तयार के ला असून तो शासनाच्या पायाभूत समितीकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्यावतीने विधानसभेत देण्यात आली. तुर्भे येथील वाहतुककोंडी फुटावी यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात-लवकर सुरु करावा, अशी मागणी आ.गणेश नाईक केली होती. याविषयी त्यांनी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उत्तर दिले. तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग तयार झाल्यावर तुर्भे येथे वाहतूक खोळंबणार नसून ती थेट खारघर येथे बाहेर पडेल. तसेच सायन पनवेल मार्गावरील वाहतुक सुरळीत होणार आहे. सदर प्रश्नी काल सभागृहात चर्चा झाली. सायन पनवेल मार्गावरील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी या मार्गाची आवश्यकता असल्याची बाब आ.गणेश नाईक यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, सायन-पनवेल मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली व पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे अशा भागात जाणारी वाहतुक याच मार्गाने होत असते. ज्या मार्गावरुन ताशी ७० कि.मी. वाहने धावणे अपेक्षित आहे त्या रस्यावर वाहतुक कोंडीमुळे ताशी ४० ते ५०च्या गतीने वाहने धावत आहेत. वाशी खाडीपुलावर चौथा पूल बांधणे प्रस्तावित आहे. तो बांधून पूर्ण झाल्यावर तर सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता तुर्भे ते खारघर हा भूयारी मार्ग तातडीने मार्गी लागण्याची निकड असल्याचे आ. गणेश नाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. खारघर येथे सिडको वाणिज्यिक केंद्र बांधणार असून सिडको महामंडळ देखील या भुयारी मार्गासाठी आर्थिक हातभार लावेलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. १२ एप्रिल २०१९ रोजी शासनाने घेतलेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या सल्लागारांनी दिलेल्या बांधकाम आराखडयांपैकी एक आराखडा निश्चित करण्यात आला असून अंतिम मंजूरीसाठी तो शासनाच्या पायाभूत समितीच्या अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.