पनवेल (प्रतिनिधी) - दहावीच्या परिक्षेच्या कालच्या पहिल्याच दिवशी शहरातील काही भागाचा विद्युत पुरवठा पहाटेपासून खंडीत झाला होता. साधारण ६ तासान तर हा वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने दरम्यानच्या काळात परिक्षेला जाणान्या विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले होते. त्यामुळे पालकांनी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. पनवेल शहरातील पायोनिअर विभाग व परिसरातील विद्युत पुरवठा साधारण पहाटे ५ च्या दरम्यान इलेक्ट्रीक केबलला तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आज परिक्षा असल्याने परिक्षेला बसलेले विद्यार्थी पहाटे अभ्यास करण्यास बसले होते. परंतु अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांच्याही अभ्यासावर परिणाम झाला. त्यानंतर परिक्षेला जाण्याची घाई होती. परंतु तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने विद्यार्थी वर्गासह पालकांनी या अनागोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. अनेकांनी संबंधित कार्यालयात फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील संपर्क फोन फक्त वाजतच होता. या विभागाचे स्थानिक नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांना त्यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचण जाणून घेतली व प्रभागातील सर्वांसाठी त्यांनी व्हाटसअप मेसेज बनवून याबाबतची माहिती दिली. साधारण ११.३० च्या नंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला होता. परंतु पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना असा अनुभव मिळाल्याने त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.
दहावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पनवेलमधील वीज पुरवठा खंडीत!!