महाड चवदार तळे वर्धापनदिन रद्द


पनवेल (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाड येथील चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त आज, (दि.२०) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपाइंचेकोकण प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या क्रांतिभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करत जुन्या चालीरीती, रूढी परंपरेला मूठमाती दिली आणि सामाजिक समतेच्या क्रांतीपर्वाला प्रारंभ केला होता. त्याअनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे चवदार तळ्यावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व व क्रांतिस्तंभाला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.