वाढत्या दगडफेकीच्या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी भयभीत

नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी म्हणून संबोधल्या जाणा-या रेल्वे मार्गावरप्रवाशांच्या दिशेने दगडफेक करण्या घटना घडत असल्याने प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत काही वेळेस कारवाई होत असली तरी अजूनही हार्बर रेल्वे मार्गावर सध्या दगडफेकीच्या घटना वारंवार घडत असल्याचे उघडकीस आले असून यामुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातातवरण आहे. गतवर्षी वाशी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. यात एका घटनेत आरपीएफचा गार्ड जखमी झाला होता. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली होती अशी माहिती वरिष्ठ पो.निरीक्षक नंदकुमार सस्ते यांनी दिली. जुईनगर ते नेरुळ या रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने दगड भिरकाल्याने लोकलच्या दरवाजात उभ्या असलेला प्रवाशी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगड भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. तर लोकलवर दगड भिरकावल्याने प्रवासी जखमी होण्याची ही गत तीन महिन्यातील तिसरी घटना आहे. मात्र यातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याचे समजते. बुधवारच्या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव वासिम इनुमुळ हक अक्तर असे असून तो बेलापूर येथे रहाण्यास आहे. मुंबईत पाईप लाईनचे काम करणारा वासिम हा बुधवारी सायंकाळी कामावरुन सुटल्यानंतर लोकलने बेलापूर येथे जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोघे । मित्रदेखील होते. लोकलमध्ये गर्दी असल्याने वासिम व त्याचे मित्र दरवाजात उभे राहून प्रवास करत होते. सदर लोकल पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने सदर लोकलवर दगड भिरकावला. सदर दगड लोकलच्या दरवाजातून प्रवास करणाऱ्या वासिम याच्या कपाळाला लागल्याने तो जखमी झाला. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला नेरुळ रेल्वे स्थानकात उतरवून रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला असून यंदाची ही पहिली घटना आहे. गत ४ डिसेंबर रोजी नेरुळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकादरम्यान, घडलेल्या दगडफेकीच्या घटनेत घाटकोपर येथे रहाणारा राकेश जनार्दन सिंग (१९) हा तरुण जखमी झाला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सीबीडी ते सीवूड्स या रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणा-या लोकलवर अज्ञात व्यक्तीने भिरकावलेला सिमेंटचा दगड संतोष नारायणकर याच्या छातीवर लागुन तो या घटनेत जखमी झाला होता.