कोरोनाविषयक उपाय योजनांसाठी कोकण विभागासाठी १५ कोटींचा निधी!

कोकण विभागीय महसुल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती



नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषयक उपाय योजनांसाठी कोकण विभागातील सात जिल्हयांसाठी शासनाकडून १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आवश्यक त्या साहित्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय महसुल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाविषयक कोकणातील सर्व ७ जिल्हयात लोकांना माहिती देणे, प्रबोधन करणे व विषाणूंचा प्रादुर्भाव वादु नये यासाठी करावयाच्या कामकाजाचा आढावा काल कोकण महसूल आयुक्तांनी पत्रकारांसमोर मांडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण महसुल आयुक्तांनी कोरोना विषाणुमुळे सध्यस्थितीत निर्माण झालेली परिस्थिती व त्यासंदर्भात शासन पातळीवरुन करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती देतांना पुढे सांगितले की, सध्यस्थितीत कोरोना विषाणू बाधित पॉझिटिव्ह असलेल्या १५ जणांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. यात ७ मुंबईतील तर ८ जण मुंबई बाहेरील म्हणजे ठाणे, कल्याण, नवी मुंबई व रायगड मधील व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. आधीचे जे नागरिक प्रवाशी आले आहेत. त्यांना १४ दिवस घरी रहाण्यास सांगण्यात आले आहे. कोकण विभागातील ७ जिल्हयापैकी ठाण्यात १८ठिकाणी १०० बेड.सची, पालघरमध्ये ३०, रायगडमध्ये ११३, रत्नागिरी जिल्हयात १०७ व सिंधुदर्गजिल्हयात १०६ अशा एकूण ६८७ आयसोल्युशन ठिकाणी बेड्सची सुविधा उपलब्ध केली असल्याचे त्यांनी सांगितले. ___ नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो लोकांची वर्दळ असते. विविध वाहनांनी हे लोक याठिकाणी येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी ३ मेडिकल चेक अप सेंटरची निर्मिती तेथे करण्यात आली असून यात थर्मल स्कॅनर व इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत व त्याअनुषंगाने एपीएमसी सचिवांना सूचनाही केल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुढी पाडव्यानिमित्त निघणाऱ्या सर्व ठिकाणच्या शोभा यात्रा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी फक्त दैनंदिन पुजा होत असून भाविकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानुसार रायगड जिल्हयातील अष्टविनायक महड व पाली या दोन धार्मिक स्थळी सध्या फक्त दैनंदिन पुजा होत असून या सुचनांचे सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पालन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विलगीकरण कक्ष सुविधेसाठी १८०० बेड्सची सुविधा सातही जिल्हयात करण्यात आली असून २९७ बेड्स आयसोल्युशनमध्ये उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूच्या उपाय योजनांबाबत कोकण विभागातील सर्व सातही जिल्हयातील महापालिका, नगरपालिका,सर्व महसुल यंत्रणा, पोलिस यंत्रणा व ग्राम विकास पातळीवरील सर्व शासकीय यंत्रणा दक्षता घेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रामुख्याने जे बाहेरुन प्रवाशी आले आहेत तेथून ही बाधा निर्माण झाली आहे असे सांगून आपल्या क्षेत्रातून हा आजार उत्पन्न झाला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. साधारणपणे गाव पातळीत एखादी बाहेरची व्यक्ती आली तर तातडीने या व्यक्ती बाबतची माहिती स्थानिक तहसिल व जिल्हा कार्यालयात दिली जाते व त्यानुसार संबंधित व्यक्तीची तपासणी करुन कोरोना विषाणूबाबत लक्षणे दिसून आल्यास १४ दिवसांसाठी निगराणीखाली ठेवण्यात येते असेही त्यांनी सांगितले. पनवेल व रायगडमधील एक क्रिकेट टीम दबईला गेली होती. या टिममधील ३५ सदस्यांना सध्या खारघरमधील ग्रामविकास सेंटरमध्ये निगरानीखाली ठेवण्यात आल्याचे शिवाजी दौंड यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी करतांना सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांना योग्य ते अधिकार दिले आहेत व त्यानुसार आवश्यक त्या उपाय योजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेप्रसंगी कोकण महसुल उपायुक्त सिधाराम सालीमठ, उपायुक्त पाणीपुरवठा शिवाजी कादबाने, कोकणविभाग माहिती विभाग उपसंचालक डॉ.गणेश मुळे आदी उपस्थित होते.