अग्निसुरक्षेबाबत हयगय नकोच!

नवी मुंबईत असलेला रोजगार, वाढते उद्योग व्यवसायशिक्षण, आरोग्य यासह अनेक प्रकारच्या मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहेशहराची लोकप्रियताही अशा गोष्टीतून स्पष्ट होत असली आणि ती अभिमानास्पद बाब असली तरी वाढती लोकसंख्या आणि उभ्या राहणाऱ्या उंच इमारती यामुळे काही खबरदारी घ्यावीच लागेल. यापैकी सद्यस्थितीत उंच इमारती मोठ्या संख्येने बांधल्या जात असून त्यातून लोकांच्या राहण्याची सोय होत आहे व व्यावसायिक गाळे, कार्यालये व छोटे मोठे उद्योग निर्माण होत असल्याने लोकांना नोकरी-रोजगारही उपलब्ध होत आहे. ही जमेची बाजू. मात्र अलिकडच्या अशा इमारतींमध्ये आग लागली तर काय घडू शकते याचाही अंदाज येत असतो. अशा घटना शहरात घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पामबीच मार्गानजिकच्या सीवूड भागात एका उंच इमारतीला आग लागली होती. मुंबईसह अन्य ठिकाणीही अशा घटना घडत आहेत. अशावेळी काही ठिकाणी अग्निसुरक्षेबाबत हयगय वा हलगर्जीपणा झाल्याने आग लागणे, ती आटोक्यात आणणे कठीण बनणे अशा बाबीही पुढे चौकशी आणि तपासातून उघड झाल्या आहेत. त्यामुळे अग्निसुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारे हयगय नकोच हे पटणारे आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीनेही जनतेसाठी हितावह अशा सूचना केल्या जातच असतात, मात्र त्यांचे पालन नागरीकांनी करावे अशी अपेक्षा असताना तसे घडतेच असे नाही आणि वारंवार सूचना देऊनही काही लोक ऐकत नाहीत असे काही मुद्दे आहेतच. अगदी रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणांवर डेब्रिज टाकू नये अशा सूचना केल्या जातात, त्यासाठी महापालिकेची यंत्रणाही सक्रिय आहे, मात्र तरीही रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणांवर डेब्रिज पडल्याचे दिसून येतेच; कुठे कचराही सार्वजनिक ठिकाणी-उघड्यावर टाकला जातो, अशा प्रवृत्तीचा त्रास अन्य लोकांना होत असतोतसाच मुद्दा अग्निसुरक्षिततेचा; नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील इमारतींची अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करुन अपर्याप्ततेची किंवा उल्लंघनाची नोटीस इमारती धारकांस बजावत असते. परंतु बहुतांश इमारत धारकांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र लायसन्स अभिकरणामार्फत सादर न केल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाच्या निर्दशनास आल्याचे दिसून येते आणि प्रशासनही त्यांना नियम, अटी पाळण्याचे आवाहन करीतच असते. मात्र त्याबाबतच्या नियमांचे १०० टक्के पालन केले जातेच असे नाही. खरे तर नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या उंच इमारती आणि त्यामध्ये स्थापन होणारे कार्पोरेट ऑफीसेस, निवासी संकुलांतून राहणारी उच्चभ्रू वस्ती शहराच्या प्रतिष्ठेत भर घालत आहे. अनेक प्रकारच्या कंपन्या, त्यांची कार्यालये (मालमत्ता) यामुळे शासनाच्या महसूलात भर पडते आणि नोकरी व्यवसायानिमित्ताने लाखो लोकांची ये-जा होत असते. तथापी ठिकाण, वास्तू कुठलीही असो; अपघात, दुर्घटना यांना निमित्त पुरेसे असते, अशावेळी त्या संकटांवर मात करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध असली तरी आताच्या घडीला शहर विकासात ज्या गतीने पुढे गेले आहे ते पाहता ही सुरक्षा यंत्रणा तोकडी पडावी अशीच स्थिती आहे. अशा संभाव्य संकटांबाबत अनेक काही मुद्दे असले तरी आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनांचे काय? असा प्रश्न पडतोच. नवी मुंबईत उंच इमारती उभ्या राहत असून त्या इमारती आणि निवासी संकुलांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा तत्पर असणे आवश्यक आहे. ज्या इमारती, कार्यालये वा अन्य वास्तू यांना महापालिकेकडून अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगूनही ते ऐकत नसतील तर त्यांचे काय करायचे? असे प्रश्न कायम असल्याचेच दिसून येते. खरे तर महापालिका प्रशासन त्यांची जबाबदारी नियमाला धरुन पार पाडत असते. मात्र त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी ती करणे आवश्यक आहे. उंच इमारतींना अग्निसुरक्षा हवीच; अन्यथा अपघात, दुर्घटना घडतील व ते टाळण्यासाठीची खबरदारी संबंधितांना घ्यावीच लागेल.