उरण (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याच्या भीतीचा परिणाम मोरा-भाऊचा धक्का या जलवाहतुकीवर होत मोजकेच प्रवाशी प्रवास करीत असल्याची कबुली लाँच चालकांनी दिली. गेले काही दिवसांपासून कोरोना व्हायरसची लागण होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेण्यास राज्य शासनाने पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने देवदेवस्थान, शाळा, कॉलेज, क्लासेस व इतर वर्दळीच्या ठिकाणांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झाला असून अनेक ठिकाणे निर्मनुष्य वाटू लागली आहेत. विशेष म्हणजे मोरा ते भाऊचा धक्का हा जलप्रवास वाहतुकीलासुद्धा याचा फटका बसत आहे. १०० ते १२५ प्रवाशी नेण्याची क्षमता असलेल्या प्रवासी लाँचमध्ये सद्यस्थितीत हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्रवाशी प्रवास करताना दिसतात. यावरून कोरोना व्हायरसचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. यामुळे हा व्यवसाय काही दिवसांपासून तोट्यात जात असल्याची माहिती लाँचचालकांनी दिली.
कोरोनाच्या भीतीचा उरण जलवाहतुकीवर परिणाम