शैक्षणिक सहलीच्या नावाखाली ४० लाख इमॅजिका वॉटरपार्कच्या पाण्यात!

मनसे विद्यार्थी सेनेची कारवाईची मागणी



नवी मुंबई (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक गोष्टींचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते, परंतु नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला या सर्व गोष्टींचा विसर पडला असून मौजमजेसाठी अश्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले असून त्यासाठी नागरिकांच्या करातील ४० ते ५० लाखांचा चुराडा शिक्षण विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उजेडात आणला आहे. त्यामुळे शैक्षणिक सहलीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि या गैरप्रकारांत दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिलेल्या निवेदनात मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी म्हटले आहे कि, दरवर्षी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी कारदात्यांच्या पैशातून राखीव निधीची तरतूद करण्यात येते. परंतु यावर्षी कुठल्याही ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणी सहल न नेता पालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खोपोली येथील इमॅजिका वॉटरपार्क येथे सहलीसाठी नेण्यात आले. विशेष गंभीर बाब म्हणजे मौजमजेच्या ठिकाणी नेण्यात आलेल्या सहलीसाठी ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला असून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दिनांक ३ ते दि. ६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत नवी मुंबई महापालिका शाळेतील इयत्ता ९ व १० वीच्या जवळपास ५000 विद्यार्थ्यांची सहल इमॅजिका वॉटरपार्क येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच या सहलीचा आनंद पालिकेतील काही शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कुटुंबीयांनीही लुटला असल्याचे समोर आले असल्याचे म्हात्रे यांनी या निवेदनातून स्पष्ट करत या सहलीच्या आयोजनात शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण गंभीर असन मौजमजेत्या ठिकाणी सहल आयोजित करून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच्या या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि या गैरप्रकारांत दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे.