तुर्भे स्टोअरमध्ये शिवसेनेला हादरा नगरसेवक राजेश शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी भाजपात


नवी मुंबई (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील मनमानी कारभाराला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देणारे शिवसेनेचे नगरसेवक राजेश शिंदे यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखाप्रमुख यांनीही शिवसेनेला रामराम ठोकला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, बहजन समाज पार्टी या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच रिक्षा संघटनांचे नेते आणि अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनेक सदस्यांसह भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. एकंदरीत भाजपमधील ही पक्षप्रवेशाची परिस्थिती पाहता तुर्भे स्टोअर विभागामध्ये भाजपची पकड मजबूत होताना दिसत आहे. याप्रसंगी आ.गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपात स्वागत केले. याप्रसंगी माजी आ. संदीप नाईक, परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख, अमृत मेढ़कर, अमित मेढ़कर आदी मान्यवर उपस्थित होते. आ.गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा विकास साधला आहे असे सांगतानाच तुर्भे स्टोअर मधील अकार्यक्षम नगरसेवकांना येथील जनता धडा शिकवून बदल घडवून आणेल असा विश्वास माजी नगरसेवक शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी आ. गणेश नाईक यांनी राजेश शिंदे यांचे भाजपमध्ये स्वागत करून त्यांच्या माध्यमातून भविष्यात तुर्भे स्टोरचा विकास व्हावा यासाठी त्यांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले. या पक्ष प्रवेशप्रसंगी राजेश शिंदे यांच्यासह समाजसेवक राजू पाखरे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख संजय गुप्ता, शाखाप्रमुख संजय गोपाळे, किशोर राठोड, सचिन वाघमारे, राजेश जवरे, राष्ट्रवादीचे प्रभाग ७० चे बाळू चंदनशिवे, बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून या प्रभागात निवडणूक लढवलेले किशोर लोंढे, राष्ट्रवादीचे तालुका सचिव गिरीश माने, भिम ज्योत मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे, तुर्भे स्टोअर रिक्षा स्टँडचे प्रमुख शंकर शिवशरण, भिमज्योत मित्र मंडळाचे सचिव सिद्धार्थ फडतरे आदींसह इतर असंख्य कार्यकत्यांनी भाजपात प्रवेश केला.