पनवेल(प्रतिनिधी) - कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे हजारो खातेदार ठेवीदार मोठ्या चिंतेत अडकले असतानाही सहकार खाते ठेवीदार आणि खातेदारांचा अंत का पाहत आहे, असा सवाल आ. प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात चर्चा करताना आ.प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा बँक घोटाळा आणि त्यामुळे ठेवीदार व खातेदारांचे झालेले हाल यावर सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत सरकारने या विषयावर दर्लक्ष करू नये अशी सूचना वजा मागणी त्यांनी केली. रायगड जिल्ह्यामध्ये गोरेगाव बँक, रोहा अष्टमी बँक, पेण अर्बन बँक, सिद्धिविनायक बँक बुडाली आता माझ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँक ही ६१ हजार खातेदार असलेली बँक तशाच पद्धतीने वाटचाल केली आहे. ६३ बेनामी कर्ज खात्यातून ५१२ कोटी रुपये बँकेच्या अध्यक्ष संचालक मंडळाकडून हडपण्यात आले आहे. मात्र सहकार खाते यावर कारवाई करीत नाही. यावर लक्ष ठेवण्याची आणि खोलवर तपास करण्याची आवश्यकता आहे, हे या बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल २०१९ मध्ये सहकार खात्याच्या लक्षात आणून दिले आणि स्पेशल ऑडिटर नेमण्याची सूचना देण्यात आली. स्पेशल ऑडिटची सूचना एप्रिल २०१९ मध्ये दिलेली असतानाही मात्र स्पेशल ऑडिट नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले आणि त्या स्पेशल ऑडिटमध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये १०७ कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवले आहेत असा स्पष्ट खुलासा झालाअसे आ.प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. जर सहकार खात्याने वेळीच या ठिकाणी तपासणी केली असती, तर किमान ठेवीदारांचे हे १०७ कोटी रुपये वाचू शकले असते. पण सहकार खाते अजूनही यावर काहीही करत नाही. आता प्रशासक नेमला गेला आहे, पण ठेवीदारांना खातेदारांना आश्वस्त केले जाऊ शकतो असे प्रशासकाच्या माध्यमातून अजून पर्यंत एका ओळीचेही प्रसिद्धी पत्रक निघाले नाही. मग अशा परिस्थितीत ठेवीदारांनी करायचे काय? असा सवालही आ.प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला. ठेवीदार व खातेदारांचे पैसे त्यांना परत मिळावेत, यासाठी शासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी पुनर्मागणी यावेळी केली.
कर्नाळा बँक कथित आर्थिक घोटाळा प्रकरणसहकार खात्याने बँक ठेविदारांचा अंत पाहू नये!