पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्याची अफवा

आयुक्त गणेश देशमुख यांची माहिती



पनवेल (प्रतिनिधी) - चीन मध्ये थैमान माजवणाऱ्या कोरोनाचे रुग्ण हे पनवेल शहरात आढळून आल्याच्या बातमीने शहरात हडकंप माजला होता. मात्र ही केवळ अफवा असून पनवेल शहरात कोरोनाचा रुग्ण नसून केवळ तपासणी मोहीम सुरू असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, पनवेल महापालिका हद्दीत राहत असलेल्या परदेशी नागरिकांची उपाय योजना म्हणून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, त्या नागरिकांना कोणताही आजार नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही अफवा असून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत परदेशी नागरिक रहात असल्याची महिती मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या परदेशी पाहण्यांची तपासणी केली असता या परदेशी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आजार अथवा सर्दी खोकला ताप यासारखे आजार नसल्याचे आढळून आले आहे. तसेच ही विशेष मोहीम २ मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख दिली.