6 हजार किमीच्या सायकल प्रवासासाठी निघालेले प्रमोद कटारा यांचे खारघरमध्ये जंगी स्वागत

 दिव्यांगांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा संदेश




खारघर (प्रतिनिधी) - आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर करणारे प्रमोद कटारा हे  दिव्यांगांना क्रिडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा संदेश देत, सहा हजार किलो मीटर सायकल प्रवास करण्याचा नवा विक्रम करण्यासाठी पुन्हा एकदा सरसावले असून खारघर येथे त्यांचे नुकतेच जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दिव्यांगांना खेळाला प्रोत्साहन द्या असा संदेश देत 6,000 किमी इतके सायकलवरून अंतर पूर्ण करण्याचा निश्‍चय करत दि.57 वर्षीय प्रमोद कटारा यांनी 8 डिसेंबर रोजी आग्रा सोडले. आग्राच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर, कटारा हे दिल्ली, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रातील ठाणे आणि गेटवे इंडिया मार्गे नवी मुंबईतील खारघर येथे नुकतेच पोहोचले असता, त्यांच्या या जिद्दी प्रवासाला सलाम करत खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी गझल गायक रंजन देबनाथ रंज, एकता, प्रमोद ब्युुटीफूल, यशवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  प्रमोद कटारा यापुढे आता पुणे, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक मार्गे चेन्नईचा प्रवास पूर्ण करणार आहेत. यात चेन्नईहून ते पुन्हा लांबचा प्रवास करून कलकत्याला जाण्याचा त्यांचा मानस आहे. कलकत्याहून ते शेवटच्या टप्प्यासाठी आग्रा येथे रवाना होतील. या संदर्भात माहिती देतांना कटारा यांनी सांगितले की, 6000 किमीचा हा प्रवास 33 दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे कटारा यांनी आतापर्यंत लिम्का बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी स्टॅमिना आणि एन्ड्युरन्सचे 31 विक्रम केले आहेत. धावण्याच्या शर्यतीत त्यांनी नुकतेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही मिळवले आहे. याशिवाय कटारा यांनी सलग 306 मॅरेथॉन धावून नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.

दरम्यान, गुडघ्याच्या आजाराने त्रस्त असलेले कटारा हे आग्रा येथे स्वतःचे आपले निदान केंद्र चालवतात आणि त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होतात. समाज आणि शासनाच्या मदतीने दिव्यांगांसाठी क्रीडा क्षेत्रात काहीतरी ठोस केले पाहिजे. विशेषत: पॅरा ऑलिम्पिकसाठी या दिव्यांगांच्या प्रशिक्षणाचा त्यात समावेश करण्यात यावा. जेणेकरून ते आपला कसब दाखवून देशाचे नाव मोठे  करू शकतील हा कटारा यांचा यामागील प्रमुख हेतु आहे.