नवी मुंबई (प्रतिनिधी) - फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परिस्थितीमध्ये यंदा या आंब्याने डिसेंबर महिन्यातच मुंबई बाजारपेठेत आगमन केले आहे. आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंब्याची चव यंदा खवय्यांना लवकर चाखायला मिळणार आहे.
यावर्षीचा कोकणच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले असून कोकणातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविद वाळके यांनी हा आंबा आणला आहे. या हंगामातील पहिले 25 डझन आंबे बाजार समितीमध्ये दाखल झाले असून या आंब्याची व्यापार्यांकडून पूजा करून विक्री करण्यात येत आहे. या आंब्याच्या एक डझनला चार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत आहे.
कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरु होते. आता जी आवक सुरु होणार आहे तरी पहिल्या टप्प्यातील आहे. वातावरणात बदलाचा फटका हा दुसर्या टप्प्यातील मोहोराला बसलेला आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील मोहोराचे नुकसान झाले असले तरी तिसर्या टप्प्यातील मोहोर चांगलाच बहरलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी तिसर्या टप्प्यात नुकसान काही प्रमाणात नुकसान भरुन निघणार आहे.