महिला आशियाई करंडक फु़टबॉल स्पर्धेच्या तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

 


नवी मुंबई (प्रतिनिधी)- 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत संपन्न होत असून या स्पर्धेच्या शुभारंभाचा सामना तसेच अंतिम सामना नवी मुंबईतील नेरुळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियममध्ये कोव्हीडविषयक सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून खेळविला जाणार आहे. या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद नवी मुंबई शहराला लाभलेले असून या स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महापालिकेच्या से-19 नेरुळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानामध्ये होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर काल आयुक्त अभिजीत बांगर यांनी नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची संबंधित अधिकार्‍यांसह बारकाईने पाहणी केली व जगभरातून येणार्‍या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या मौल्यवान सूचना केल्या.

  याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा विभागाचे उप आयुक्त मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्तापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी मिताली संचेती, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व श्री. सुभाष सोनावणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, यापूर्वीही सन 2017 मध्ये फिफा - 17 वर्षाखालील पुरुष विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नवी मुंबईत खेळविण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकवार या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबई यजमानपद भूषवित आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 19 नेरुळ येथे सन 2017 मधील फिफा स्पर्धेकरिता विकसित करण्यात आलेले यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्यावेळी त्याठिकाणी सराव केलेल्या न्यूझिलंड, इंग्लड, स्पेन, ब्राझिल, बाली, टर्की अशा नामांकीत संघातील खेळाडूंनी केली होती. या स्पर्धांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने फिफा आयोजकांच्या तांत्रिक समितीने महानगरपालिकेच्या क्रीडा व अभियांत्रिकी विभागाच्या अधिका-यांसमवेत यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाची व तेथील सुविधांची दोनदा पाहणी केली असून त्या अनुषंगाने शॉवर सुविधेसह ड्रेसींग रूम, रेस्ट रुम, वेटींग लाँज, स्टोअर रुम अशा आवश्यक सुविधांची तसेच पुरेशा प्रमाणात फ्लड लाईट्सची सर्व अनुषांगिक सुविधांसह व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रत्येक सुविधा कक्षाला आयुक्तांनी भेट देऊन त्याची बारकाईने पाहणी केली व यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

नवी मुंबई महापालिकेने फिफा आणि आशियाई करंडक स्पर्धेच्या निमित्ताने विकसित केलेले हे फुटबॉल क्रीडांगण या स्पर्धा झाल्यानंतर शहरातील फुटबॉल खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात यावे व त्यांच्यामधून दर्जेदार व्यावसायिक संघ निर्माण करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे आयुक्तांनी क्रीडा विभागास यावेळी निर्देशित केले.