दोन दिवसात 2 लाख 80 हजाराहून अधिकची दंडात्मक वसूली
नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या विशेष दक्षता पथकांना दिले आहेत. त्यानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास महापालिकेने पुन्हा एकदा सुरुवात केली असून कोव्हीड प्रतिबंधात्मक उल्लंघनापोटी दोन दिवसात 2 लाख 80 हजारांहून अधिकची दंडत्मक वसूली करण्यात पालिकेला यश आले आहे.
या कारवाईच्या अनुषंगाने विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी तसेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी विविध समारंभ स्थळे, सार्वजनिक जागा, आस्थापना येथे अचानक भेटी देत कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिक ,आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये मास्क न वापरणार्या नागरिकांकडून 1 लाख 45 हजार 500 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून सुरक्षित अंतर नियमावलीचे उल्लंघन करणार्या नागरिक व आस्थापनांकडून रुपये 20 हजार 600 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. याशिवाय कोव्हीड नियमावलीचे उल्लंघन करणार्या आस्थापनांकडून 1 लाख 15 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शनिवारी ख्रिसमस व त्यानंतरचा रविवार अशा 2 दिवसात एकूण 2 लक्ष 81 हजार 100 इतका दंड महापालिकेच्या दक्षता पथकांनी वसूल केला आहे.
यामध्ये वाशी विभागात सेक्टर 30 ए येथील इनॉर्बिट येथील केएफसी सफायर फुड्स येथे 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त उपस्थिती असल्याने रु. 50 हजार इतका तसेच हार्ड केसल (मॅक़डोनल्ड्स) यांच्याकडून रु. 15 हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे मराठी साहित्य संस्कृती मंडळ सेक्टर 6 (रु.5000/-), ब्लु इम्पिरियल बेंक्वेट हॉल (रु.10,000/-), साई पॅरेडाईज बेक्वेंट हॉल (रु.15,000/-), आएशा सलून (रु.2000/-), एनएमएसए बेक्वेट हॉल (रु.2500/-), बंगाली असोसिएशन हॉल (रु.1500/-), तुंगा बेक्वेट हॉल (रु.6000/-), मर्चंट जिमखाना बेक्वेट हॉल (रु2500/-) अशा विविध समारंभ, शुभविवाह स्थळे याठिकाणीही काटेकोर लक्ष ठेवून मास्क न वापरल्याबाबत दंडात्मक वसूली करण्यात आलेली आहे.
बेलापूर विभागामध्ये से 42 येथील अपना बाजार, चारभुजा स्विट्स, तिरुपती डोसा या आस्थापनांकडून प्रत्येकी रु.10,000/- असा एकूण रु.30,000/- इतका दंड वसूल करण्यात आला.तर ऐरोली विभागामध्ये सेक्टर 15 येथील हेगडे भवन सभागृहात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्यापोटी रु.10,000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागामध्येही मॅफको मार्केट येथील नरेंद्र वाईन्स या आस्थापनेकडून रु.10,000/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे मुख्यालय स्तरावरील विशेष पथकांनी सेक्टर 14 कोपरखैरणे येथील पंजाब चायनीज तसेच सेक्टर 14 बेलापूर येथील राधा कृष्ण डेअरी या आस्थापना रात्री 12 नंतरही सुरु असल्याचे आढळल्याने कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावली अंतर्गत प्रत्येकी रु.10,000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.