सिडकोच्या नियोजन शुन्य कारभारामुळे भविष्यात गंभीर पाणी टंचाई उद्भवणार!

आ. प्रशांत ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली भीती 








पनवेल (प्रतिनिधी) - सिडकोच्या नियोजन शुन्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणार्‍या गृह प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आ. प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली असून त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणी केली आहे.

पनवेल तालुक्यातील सिडको व नैना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तसेच सर्वसामान्यांना परवडणार्‍या मोठया प्रमाणावर राबविण्यात येत असणार्‍या गृहनिर्माण प्रकल्पाला तातडीने  मुलभुत सुविधा, नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जुलै 2021 मध्ये वा त्यादरम्यान उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको लि., नवी मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिडको विकसीत खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही विभागांत अत्यंत अनियमित पाणी पुरवठा होत असून नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे सिडकोच्या नियोजन शुन्य कारभारामुळे तसेच नव्याने विकसित होणार्‍या गृह प्रकल्पामुळे भविष्यात याठिक़ाणच्या नागरिकांना गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

सिडकोने विकसित केलेल्या कामोठे येथील वाढती लोकसंख्या पहाता पिण्याच्या पाण्याची क्षमता 42 एमएलडी इतकी असून मागील दोन महिन्यापासून 20 ते 25 एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याची बाबही त्यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रकरणी सिडकोमार्फत नव्याने विकसित होणार्‍या मोठ्या प्रमाणातील गृहप्रकल्पांना पाणी पुरवठयाचे वेळीस उपाययोजना न झाल्यास भविष्यात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण होणार असून या प्रकरणी शासनाने चौकशी करून सिडको हद्दीतील गृहप्रकल्प, नव्याने निर्माण होणार्‍या गृह प्रकल्पांना तसेच कामोठे येथील वसाहतींना पाणी पुरवठा होण्याबाबत कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आ. प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात सांगितले कि, सिडको मार्फत संबंधित विभागांना वा नोडसला पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीचे बारवी, पाताळगंगा स्त्रोत, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या मोरबे प्रकल्प तसेच न्हावा शेवा टप्पा-1 अंतर्गत भाग भांडवल देऊन वेळोवेळी पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नव्याने विकसित होणार्‍या गृहप्रकल्पांसाठी व नैना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या वसाहतीसाठी सन-2050 पर्यंत लागणार्‍या पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने हेटवणे पाणी पुरवठा योजना (270 द.श.लि.), बाळगंगा बाळगंगा पाणी पुरवठा योजना (350 द.श.लि.), कोंढाणे पाणी पुरवठा योजना (250 द.श.लि.), मोरबे पाणी पुरवठा योजना (250 द.श.लि.), व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण न्हावा शेवा टप्पा 1 ते 3 योजनेमधुन (154 द.श.लि.) असा एकूण 1114 द.श.लि. पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. भविष्यात गृहनिर्माण प्रकल्पामधुन निर्माण होणार्‍या सांडपाण्याच्या प्रक्रियेचा व पाणी पुनर्वापर प्रक्रियेचा समावेश नियोजनामध्ये केलेला आहे. पाणी पुरवठा व योग्य दाबाने करण्यासाठी टाटा कन्स्लटिंग इंजिनियर्स (ढउए) ची नियुक्ती केली असुन त्यांच्या सुचनेनुसार पाणी पुरवठा समतोल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.