मनसे सहकार सेनेची अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मागणी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईसह ठाणे व नवी मुंबई विभागात मोठ्या प्रमाणात सुट्टे तसेच पिशवी बंद दुधामध्ये भेसळ होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या प्रकारातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याची तक्रार मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त नरेश पी. आढाव यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली असून दुधातील हे भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी उपाय योजना करण्यासह संबंधितांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई तसेच नवी मुंबई व ठाणे विभागात होत असलेल्या दुध भेसळीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काल मनसेच्या एका शिष्टमंडळाने अन्न व औषधे विभागाचे सहआयुक्त नरेश आढाव यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करत विविध मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. मुंबई तसेच नवी मुंबई व ठाणे विभागात मोठ्या प्रमाणात सुट्टे तसेच पिशवी बंद दुधा मध्ये होणारी भेसळ हा फारच मोठा चिंतेचा विषय आहे. कुठल्याही प्रकारच्या नियमित चाचण्या अभावी निकृष्ट दर्जाचे सुट्टे तसेच पिशवी बंद दूध मोठ्या प्रमाणात उपरोक्त परिसरामध्ये विकले जात असून ज्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची तक्रार या निवेदनातून करण्यात आली आहे. परराज्यातून रस्ते व रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तसेच मिठाई बनवण्यासाठी लागणारा मावा तसेच खवा ह्या क्षेत्रात येत आहे .त्यानंतर कुठल्याही प्रकारची नियमित चाचणी बाबतची याठिकाणी व्यवस्था नसल्या कारणाने दुध भेसळीचे हे प्रकार अव्याहतपणे सुरू आहेत. कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ व्हावी ह्या सामान्य जनतेच्या भावनेचा गैरवापर करत-2 मिल्क सारख्या संकल्पना आणून , कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक प्रमाण नसलेल्या गोष्टींचे प्रसार व प्रचार करून दुप्पट किमतीने दूध विकून जनसामान्यांची फसवणूक करून त्यांना लुबाडण्याचे काम खासगी क्षेत्रातील काही दूध उत्पादक करीत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. ए 2 व तत्सम दुध ओरगॅनिक मिल्कच्या नावाखाली महागड्या किमतीत विकले जाणारे दूध सुद्धा नियमित चाचणी अभावी संशयाच्या भोवर्यात आहेत, उपरोक्त हे सर्व मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे व आर्थिक फसवणुकीचे आहेत. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी मुंबईत येणार्या दुधाची नियमित चाचणी करावी, मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरात विकल्या जाणार्या दुधाच्या गुणवत्तेची, एफएसएसएआयने ठरवलेल्या निकषांप्रमाणे अतिशय कठोर चाचणी करावी जेणेकरून अशा दुष्कृत्यांवर निर्बंध घालून जनतेच्या आरोग्याची काळजी घेता येईल तसेच त्यांची आर्थिक फसवणूक टाळता येईल. तसेच मनसे शिष्ट मंडळाच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन तसेच महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून सर्व मोक्याच्या ठिकाणी चाचणी केंद्रे उभारून अद्यावत ऑटोमेटिक मिल्क टेस्टर मशीन ह्यांच्या मार्फत ह्या चाचण्या त्वरित सुरू कराव्यात अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबत सहआयुक्त आढाव यांनी सकारात्मक असा प्रतिसाद लवकरच हे विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनचे सरचिटणीस विजय जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मुंबई उपाध्यक्ष संजय धावारे, विनायक हजारे, विनायक जाधव, आशिष मोरे, संकेत निवडुंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मनसे सहकार सेनेच्या या निवेदनानंतरही कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.