मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागेना!

 आ. प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे वेधले लक्ष 

पनवेल (प्रतिनिधी) - मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून हे काम संथगतीने सुरु असल्यामुळे या मार्गावरील चालक आणि प्रवाशी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेवून भाजपचे आ. प्रशांत ठाकूर व आ. महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे मागील अनेक वर्षापासून चौपदरीकरण करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी दररोज मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच या महामार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे लाखो लिटर इंधनही वाया जात असून नागरिकांना व प्रवाशांना मोठया प्रमाणात शारिरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे,  महामार्गाच्या दहा टप्प्यांचे काम करणार्‍या 11 पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी 60 टक्क्यांपर्यंतही काम केलेले नाही, त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने पूर्णत्त्वास नेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, वा करण्यात येत आहे, असा सवाल या तारांकित प्रश्नाद्वारे आ. प्रशांत ठाकूर आणि आ.महेश बालदी यांनी शासनाला केला. 


या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या पनवेल ते इंदापूर (कि.मी.  ते कि.मी.84) या लांबीतील चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असून त्यांचेमार्फत प्रगतीपथावर आहे. सदर लांबीतील चौपदरीकरणाचे खाजगीकरणांतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरीत करा याच्या उत्तरात नमूद तत्वावर हाती घेण्यात आलेले काम संथ गतीने सुरु आहे. तथापि सदर उर्वरीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

महामार्ग प्राधिकरणाकडून तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत यादृष्टीने वाहतूक सदृश्य स्थितीत राखण्यासाठी कंत्राटदाराच्या खर्चाने व जबाबदारीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा रा.म.66 रस्त्याच्या इंदापूर ते झाराप (कि.मी.84/00 ते कि.मी. 450/170) या एकूण 355.285 कि.मी.लांबीतील चौपदरीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत हाती घेण्यात आले आहे. सदर लांबीपैकी एकूण 210.580 कि.मी. लांबीतील काम पूर्ण झाले असून उर्वरीत 144 कि.मी. लांबीतील महामार्गाचे काम प्रगतीत आहे. तथापि प्रगतीपथावरील लांबीपैकी इंदापूर ते वडपाले व पर्शुराम घाट ते वाकेड मधील 117.36 कि.मी. लांबीचे काम संथगतीने सुरु आहे. परंतु सदर काम लवकर पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात येऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावरील चौपदरीकरणाचे काम सुमारे 88 टक्के पूर्ण झाले असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळविले आहे. तसेच राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत (छक, झथऊ) हाती घेण्यात आलेले इंदापूर ते झाराप या लांबीतील 10 टप्प्यांतील कामांमधील टप्पा क्र.4(कशेडी ते पर्शुराम घाट), टप्पा क्रं. 8 वाटूळ ते तळगांव), टप्पा क्रं. 9 (तळगांव ते कळमठ) व टप्पा क्रं. 10 कळमठ ते झाराप) अशा चार टप्प्यांतील काम जवळपास पूर्ण झाले आहे व टप्पा क्र.2 (वडपाले ते भोगाव खुर्द), टप्पा क्रं. (भोगाव खुर्द ते कशेडी) या दोन टप्प्यांमधील काम सुमारे 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत चार टप्प्यांमधील (इंदापूर ते वडपाले व परशुराम घाट ते वाकेड) काम प्रगतीत असल्याचे ना. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर असलेल्या कामाकरिता सवलत करारनाम्यानुसार मूळ सवलत करार समाप्त करण्याचे आदेश दि. 17 नोव्हेंबर.2021 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. उर्वरीत कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असून सदर काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पनवेल यांनी कळविले आहे. तसेच राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत  हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी टप्पा क्र. 1 (इंदापूर ते वडपाले) व टप्पा क्रं.5, परशुराम घाट ते आरवलीच्या कामांची प्रगती लक्षात घेवून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार सदर काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे व टप्पा क्र.6, आरवली ते कांटे व टप्पा क्र.7, कांटे ते वाकेड मध्ये उर्वरीत कामांकरीता पर्यायी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून त्यानुसार सदर कामे डिसेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी स्पष्ट केले.