चार डान्स बारचे परवाने रद्द तर सहा बारवर गुन्हे दाखल!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत डान्स बारच्या आड वेश्या व्यवसाय चालत असल्याची गंभीर बाब काही प्रसारमाध्यम व वृत्तपत्रांनी मांडल्यानंतर मंगळवारी विधानसभेत यबाबतचे तीव्र पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटल्याचे पहावयास मिळाले. नवी मुंबईत डान्सबारच्या आड सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या या गंभीर मुद्याबद्दल बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त करत सरकारला धारेवर धरत, तेथील अधिकार्यांना याचा जाब विचारा व सरकारने गंभीरतेने याबाबत सभागृहात निवेदन करावे अशी मागणी लावून धरली होती. यासंदर्भात या संपूर्ण प्रकाराची तीव्र दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतली आहे. यापैकी सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार डान्स बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिले आहेत. तसेच 10 बारला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करतांना सभागृहासमोर सांगितले.
नवी मुंबईतील डान्सबारमध्ये चालणार्या या प्रकाराबद्दल सभागृहात सरकारचे लक्ष वेधतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईत सहा डान्सबारमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या क्लिप समोर येत आहेत. राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत संचारबंदी व जमावबंदी लावण्यात आली आहे. हे सर्व सामान्यांसाठी आहे. मात्र डान्सबार सर्रासपणे सुरु आहेत. वाशी येथील भारती व राजमहल या डान्सबारमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर येत आहे. मुलींच्या दिसण्यावरून त्यांचे दर ठरतात हे कॅमेर्यात दिसत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दर कमी जास्त होतात. ही अतिशय निंदनीय व घाणेरडी अशी परिस्थिती आहे. एका मुलीचा दर तीन हजार रुपये असल्याची माहिती समोर येत आहे असे सांगून हे काय चाललं आहे. इथे अधिवेशन आहे. मात्र नवी मुंबईत असं चालत असेल तर मंत्री महोदयांना कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी द्यावेत अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच या भागात कोण अधिकारी आहेत, त्यांनाही याबाबतचा जाब विचारावा. किमान विधानसभा अधिवेशन चालु असल्याची भीतीही या अधिकार्यांना वाटत नाही. त्यामुळे याबाबत गंभीरतेने निवेदन करण्याचे आदेश अध्यक्षांनी सरकारला द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करतांना, याप्रकरणी सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार डान्स बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 10 बारला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सभागृहात सांगितले. पेपर फुटीच्या प्रश्नासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, पेपर फुटला हे खरं आहे. पेपर फुटीला कोण जबाबदार आहे याचा विचार न करता आम्ही या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घातलं आहे. शेवटचा आरोपी मिळेपर्यंत कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.