थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साधेपणाने साजरे करा... सुचनांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई!

 पनवेल तालुका पोलिसांची फार्म हाऊस, हॉटेल, रिसॉर्ट मालकांशी बैठक संपन्न 




पनवेल (प्रतिनिधी)- कोरोनाच्या ओमोक्रॉन या नव्या व्हेरीएंटमुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीमुळे थर्टी फर्स्ट व नूतन वर्षाचे सेलिब्रेशन अत्यंत साधेपणाना साजरे करा असे आवाहन महापालिकेसह पोलिस यंत्रणांकडून केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट चालक मालकांबरोबर पोलिसांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बैठकीत पोलिसांकडून उपस्थितांना विविध प्रकारच्या सुचना करण्यात आल्या व या सुचना व नियमांचे उल्लंघन करणार्‍या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत यावेळी पोलिसांकडून देण्यात आले.

या बैठकीत उपस्थितांना प्रामुख्याने, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 31 डिसेंबरच्या अनुषंगाने सार्वजनिक करमणुकीचा कार्यक्रम व नियोजन करण्यास किंवा तशी प्रसिद्धी जाहिरात देऊ नये तसेच थर्टी फर्स्ट व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन करण्यात आले. नववर्षाच्या स्वागता निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभागी होणार्‍या लोकांचे जीवितास कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधिताने घ्यावी, नववर्ष सेलिब्रेशननिमित्त जुगार खेळणे,  दारू अथवा ड्रग्ज सेवन करणे अथवा कर्णकर्कश आवाजाचे डी.जे लावून आजूबाजूच्या लोकांना उपद्रव करण्याचे प्रकार घडून आल्यास अथवा विना परवाना कार्यक्रमांचे आयोजन केले गेल्यास संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कार्यक्रमात कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी फार्महाउस मालक आयोजक यांची राहील अशा विविध सुचना पोलिसांकडून करण्यात आल्या. यावेळी या बैठकीसाठी फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्टचे चालक व मालक आदी उपस्थित होते.