पनवेल (वार्ताहर) - कोरोनाचे वाढते रुग्ण पहाता आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलिस विभागाच्या मदतीने महापालिकेने प्रत्येक प्रभागानूसार पालिकेच्या 50 अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी व कर्मचार्यांना कारवाई संदर्भात सूचना दिल्या. यापुढे महापालिका अॅक्शन मोडवर राहणार असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2021 रोजी व दि. 1 जानेवारी, 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरी राहून साधेपणाने साजरे करावे. रात्री 9:00 ते सकाळी 6:00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, सदर आदेशांचे पालन न करणार्या नागरिकांवर कडक कारवाई पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.