जे कामावर येत नाहीत, त्यांना घरी पाठवणार!

 एसटी महामंडळाचा कठोर इशारा


मुंबई - एसटी कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्‍यांवरील कारवाई सत्र सुरुच आहे. 1500 हून अधिक एसटी कर्मचार्‍यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांना घरीच पाठवणार, असेच संकेत एसटी महामंडळ प्रशासनाने दिले आहेत.

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यभर एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र, प्रवाशांचे होत असलेले हाल, एसटीचे होणारं नुकसान पाहता, आता एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यानुसार बडतर्फीची नोटीस पाठविण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये कर्मचारी कामावर परत न आल्यास आणखी काही कर्मचार्‍यांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावे, अद्याप वेळ गेलेली नाही, असे संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, जे संपावर कायम राहतील त्यांना घरीच पाठविले जाईल, असे संकेत बडतर्फीच्या कारवाईतून देण्यात येत आहेत.