कोविड नियम मोडून वाढदिवसाचे सेलिब्रेशन!


 पनवेल (प्रतिनिधी)- कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरीएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर करत काही निर्बंध घालण्यासह रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 हून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. मात्र असे असले तरी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या गर्दीत नुकताच मोठ्या जल्लोषात साजरा केला. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधी असलेले गायकवाड यांनी,  राज्य सरकारनेच घालून दिलेले कोविड विषयक सर्व नियम पायदळी तुडविल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर सध्या चौफेर टिका होतांना दिसत आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या या कृतीबद्दल पनवेल महापालिकेसह पोलिस यंत्रणांनी त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे या सोहळयाला पनवेलमधील सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेते मंडळीसह इतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी अनेकांना कोरोनाचा विसर पडून ते मास्कविना या सोहळ्यात वावरतांना दिसत होते. एकंदरीत झालेल्या या बेफिकीरीच्या प्रकारामुळे जबाबदार पदावर बसलेले नेते मंडळीच कोरोना विषयक नियमांची पायमल्ली करत असल्याचे चित्र यानिमित्ताने पहायला मिळाले. दरम्यान, मोकळ्या जागेतील कार्यक्रमात क्षमतेच्या 25 टक्के उपस्थिती ठेवण्याचे निर्देश असतांना क्षमतेच्या दुप्पट गर्दी करून सर्व नियमांची पायमल्ली या कार्यक्रमातून यावेळी झाल्याचे दिसून येत होते. आपल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करत गायकवाड यांनी एकप्रकारे आपले शक्तिप्रदर्शनच यानिमित्ताने केले होते. विशेष म्हणजे रात्री 9 नंतरही हा कार्यक्रम थाटात पार पडत असतांना, पनवेल महापालिका व नवी मुंबई पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचे याविषयी जागरूक नागरिकांनी सांगत या प्रकाराबाबत तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली. दरम्यान, एका जबाबदार पदावरील लोकप्रतिनिधीने कोरोना काळात असा नियम मोडून वाढदिवस साजरा केल्याने सध्या समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. नियम फक्त सर्वसामान्यांसाठी असतात, लोकप्रतिनिधी व जबाबदार पदावरील व्यक्तींसाठी नाही, असा संदेश यातून जाऊ शकतो. त्यामुळे सामान्य जनताही नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करू शकते. यातून संसर्ग पसरण्याचा मोठा धोका आहे. सरकारकडून सामान्यांना नियम पाळण्यास भाग पाडले जाते, मग लोकप्रतिनिधींनाही नियमांची जाणीव करून दिली पाहिजे अशा भावना जागरूक नागरिकांमध्ये व्यक्त होतांना दिसत असून विना मास्क फिरणार्‍यांवर महापालिका व पोलिस यंत्रणा कारवाई करतात. मग अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून बर्थडे सेलिब्रेशन साजरा करणार्‍यांवर महापालिका व पोलिस यंत्रणा काय कारवाई करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.