अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे कळंबोली बनतेयं हातगाड्यांचे शहर!

बदली झालेल्या अधिकार्‍यांच्या नावाने लागतात हातगाड्या 



कळंबोली (वार्ताहर)- पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीची सध्या बेकायदा फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचे शहर अशी नवी ओळख निर्माण होवू लागली आहे. 

पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमणमुक्त शहर बनविण्यासाठी डॉ. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार कंबर कसली असून त्याप्रमाणे पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर परिसरात प्रभाग समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत वेळोवेळी फिरत्या हातगाड्या व अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. अनेकदा प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांवर हफ्तेखोरीचे आरोप देखील काही व्यासायिकांनी लावले व त्यानंतर  आयुक्त गणेश देशमुख यांनी काही अधिकार्‍यांच्या बदल्या देखील केल्या होत्या. मात्र आता पुन्हा कळंबोली परिसरात फिरत्या हातगाड्या, आईस्क्रीमच्या गाड्या, फळे व भाजी विक्री करणारे टेम्पो, खाद्यपदार्थांच्या गाड्या खुलेआम लागत असून अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईमध्ये देखील दुजाभाव करीत असून कळंबोलीतील प्रकल्पग्रस्त लोकांच्या गाड्या लावू नये यासाठी प्रयत्न करत असून इतर राज्यातून आलेल्या लोकांच्या गाड्या कशा लागतील याकडे अधिक लक्ष देत आहेत असा आरोप जागरूक नागरिकांकडून यासंदर्भात माहिती देतांना केला जात आहे. तसेच याबाबत अधिक माहिती घेताना या गाड्या कोणाच्या आहेत असे विचारले असता, पनवेलमहापालिकेतून बदली होऊन गेलेल्या काही अधिकार्‍यांच्या नावाने या गाड्या सुरु असल्याची माहिती काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

कळंबोली शहराची होत असलेली ही नवी ओळख पाहता, आयुक्तांनी याबाबत अधिक माहिती घेऊन अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून पुन्हा त्यांची उचलबांगडी इतर विभागात करावी अन्यथा भविष्यात याप्रकारामुळे पनवेल महापालिकेचे नाव बदनाम होईल यात शंकाच नाही अशा भावना संतप्त स्थानिकांककडून व्यक्त केल्या जात आहे. आम्ही कळंबोली शहरामध्ये पूर्वीपासून राहत असून आमच्या जमिनी देखील आम्ही विकासासाठी सरकारला दिल्या आहेत. असे असतांना आम्ही याठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करून आमचा उदरनिर्वाह करीत आहोत. मात्र पनवेल महापालिकेचे काही अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे आमच्या गाड्यांवर जाणूनबुजून कारवाई करून परप्रांतीय लोकांच्या गाड्या कशा लागतील याकडे अधिक लक्ष देत आहेत असल्याचा आरोप यावेळी स्थानिक व्यावसायिकांनी केला.